योगींच्या राज्यात पंतप्रधान मोदींच्या भावाचे धरणे आंदोलन

टीम ई सकाळ
Wednesday, 3 February 2021

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या विमानतळाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे धरणे आंदोलन करत आहेत. समर्थकांना ताब्यात घेतल्यानं नाराज झालेल्या प्रल्हाद मोदी यांनी विमानतळाबाहेरच ठिय्या मांडला. 

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या विमानतळाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे धरणे आंदोलन करत आहेत. समर्थकांना ताब्यात घेतल्यानं नाराज झालेल्या प्रल्हाद मोदी यांनी विमानतळाबाहेरच ठिय्या मांडला. प्रल्हाद यांनी लखनऊ पोलिसांच्या कार्यपद्धतीविरोधात हे आंदोलन सुरु केलं आहे. तसंच समर्थकांची सुटका केली नाही तर उपोषणही करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. 

प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं की, माझ्या स्वागतासाठी येणाऱ्या 100 कार्यकर्त्यांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मी तोपर्यंत धरणे आंदोलन करेन जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका होणार नाही. लखनऊ पोलिसांनी सांगावं की कोणाच्या आदेशावरून त्यांना ताब्यात घेतलं. पंतप्रधान कार्यालयाचा आदेश असेल तर तो आदेश दाखवा असंही ते म्हणाले. 

हे वाचा - ''शेतकरी आंदोलन हा तर प्रयोग, यशस्वी झाल्यास राम मंदिर, CAA ला विरोध होईल''

आमचा 4 फेब्रुवारीला सुल्तानपूर इथं आणि 5 फेब्रुवारीला जौनपूर, तर 6 फेब्रुवारीला प्रतापगढ इथं कार्यक्रम होता. यासाठी मी आज लखनऊ विमानतळावर पोहोचलो. इथं आल्यावर मला समजलं की, आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळेच मी धरणे आंदोलन करत आहे. विमानतळावर तोपर्यंत आंदोलन करणार आहे जोपर्यंत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सोडलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

याआधी राजस्थानमध्येही प्रल्हाद मोदी यांनी जयपूरच्या पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केलं होतं. 14 मे 2019 मध्ये त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र गाडीच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळी एक तास पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून नाराजी व्यक्त केली होती. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी मनधरणी केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं होतंच. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi s brother sat on strike at lucknow airport