पंतप्रधान मोदी म्हणतात, वाराणसीत मला कोणी मोमोजही विचारत नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

कोरोनाचा फटका बसलेले पदपथावरील छोटे व्यावसायिक व फिरत्या विक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी केंद्र सरकारने २ जूनपासून सुरू केलेल्या पंतप्रधान ‘स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी’ योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

नवी दिल्ली - ‘‘ मी वाराणसीला आलो तर कोणी मला तेथील प्रसिद्ध मोमजही खाऊ घालत नाहीत..’’ अशी प्रेमळ तक्रार कोण्या सामान्य काशीवासीयाने नव्हे तर गेली ६ वर्षे वाराणसीचे खासदार असलेल्या साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोनाचा फटका बसलेले पदपथावरील छोटे व्यावसायिक व फिरत्या विक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी केंद्र सरकारने २ जूनपासून सुरू केलेल्या पंतप्रधान ‘स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी’ योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

कॉंग्रेससह विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘‘ गरिबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या काळात देशात असे वातावरण तयार केले गेले की गरिबाला कर्ज दिले तर तो ते परत करणारच नाही. मात्र आमच्या देशातील गोरगरीब स्वतःचा आत्मसन्मान व प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड करत नाही व करणारही नाही.’’

स्थानिकांच्या प्रतिक्रिया
वाराणसीच्या कबीरनगरात मोमोज विकणाऱ्या अरविंद मौर्य या विक्रेत्याने सांगितले की, आधार कार्डवर मला कर्ज मिळाले व लॉकडाउननंतर माझे काम पुन्हा सुरू झाले आहे. त्यावर मोदींनी, मी तेथे येतो तर मला कोणी मोमोजही विचारत नाही, असे सांगितले. आग्रा येथील प्रीती यांनी, लॉकडाउनमध्ये आमचे हाल झाले असे सांगताच पंतप्रधानांनी तेथील नगरपालिकेचे अधिकारी तुमच्याकडे येतील असा विश्‍वास त्यांना दिला.

हे वाचा - माझा मुलगा 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला; ट्रम्प यांचा अजब दावा

सबका साथ, सबका विकास
पूर्वी कर्जासाठी लोकांना बॅंकेच्या चकरा माराव्या लागत असत. आता बॅंकाच लोकांकडे येत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘ कोरोनाने बड्या बड्या अर्थसत्तांना गुडघे टेकायला लावले आहे. भारतातील सामान्य माणसाने लढाई जिद्दीने चालू ठेवली. कोरोनाला पूर्णपणे हरविण्यात सामान्य भारतीयांचा वाटा मोठा आहे. या योजनेत वेळेत हप्ते भरले तर व्याजावर ७ टक्के सूट मिळते व डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना १०० रूपये कॅशबॅकचा बोनसही मिळतो. कर्ज घेताना कागद नाहीत, गॅरेंटर नाही, दलाल नाही व सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजविणेही नाही अशा या योजनेमागे सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास हीच कल्पना आहे.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi talks with street vendors in varanasi via video conference