esakal | 'मुख्यमंत्री असून हतबल'; केजरीवाल यांनी मोदींसमोर जोडले हात

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

दिल्लीत ऑक्सिजनचा कारखाना नसल्याने येथील नागरिकांना ऑक्सिजन मिळणार नाही का?

'मुख्यमंत्री असून हतबल'; केजरीवाल यांनी मोदींसमोर जोडले हात
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Coronavirus : नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना देशभरातील अनेक राज्यांना करावा लागत आहे. यापासून राजधानी दिल्लीही दूर राहिली नाही. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काही तास पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याने ऑक्सिजनचा लवकरात लवकर पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत केली. ही मागणी करताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींसमोर हात जोडले. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ट्रकची अडवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री असूनही मी काही करू शकत नाही. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही स्वत:ला माफ करू शकणार नाही, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: आता प्रवासासाठी पुन्हा ई-पास आवश्यक; कसा काढायचा?

केजरीवाल पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने दिल्लीसाठी ऑक्सिजनचा कोटा वाढविला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण येथील परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे. दिल्लीत ऑक्सिजनचा कारखाना नसल्याने येथील नागरिकांना ऑक्सिजन मिळणार नाही का? ऑक्सिजनची वाहतूक करणारे ट्रक अडवले गेल्यानंतर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा फक्त दोन तास पुरेल एवढाच शिल्लक असेल किंवा संपला असेल, आणि तेथील लोक मरण पावले, तर मी कुणाशी बोलू?

हेही वाचा: दहावीनंतर आता स्कॉलरशिप परीक्षाही रद्द होणार?

मी दिल्लीच्या जनतेच्या वतीने हात जोडून आवाहन करत आहे की, तत्काळ पावले उचलली गेली नाही, तर दिल्लीत मोठी शोकांतिका घडू शकते. जर तुम्ही ऑक्सिजनची वाहतूक होत असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या तर योग्य होईल, मला तुमची मदत हवी आहे.

ऑक्सिजनचे कारखाने सैन्याच्या ताब्यात द्या

कोरोनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय योजना बनवायला हवी. त्याअंतर्गत देशातील ऑक्सिजनचे सर्व कारखाने सैन्याच्या ताब्यात द्यावेत. प्रत्येक ट्रकसोबत सैन्याचं एक एस्कॉर्ट वाहन असेल, तर कुणीही ते ट्रक अडवणार नाहीत. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून १०० टन ऑक्सिजन येणार आहे, आम्ही तो दिल्लीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शक्य असेल तर ऑक्सिजनची वाहतूक विमानाने करावी किंवा ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे दिल्लीला ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.