नरेंद्र मोदींच्या भावाची पोलिस चौकीबाहेर बैठक

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना उदयपूर ते जयपूरला असा प्रवास करायचा होता. प्रल्हाद मोदींना एस्कॉर्ट वाहन न दिल्यामुळे त्यांनी बागरू पोलिस चौकीबाहेर बैठक मारली.

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना उदयपूर ते जयपूरला असा प्रवास करायचा होता. पोलिसांनी एस्कॉर्ट वाहन न दिल्यामुळे त्यांनी बागरु पोलिस चौकीबाहेरच बैठक मारल्याची घटना घडली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, 'मंगळवारी (ता. 14) सायंकाळी मला उदयपूर ते जयपूर असा 30 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. मी कुठेही जातो, तेव्हा मला राज्य सरकारकडून एस्कॉर्ट वाहन दिले जाते. पण जयपूरच्या पोलीस आयुक्तांना माझ्यापासून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काहीतरी अडचण असावी. त्यामुळेच त्यांनी मला स्वतंत्र एस्कॉर्ट वाहन देण्यास नकार दिला. पोलिस आयुक्तांनी माझ्या सुरक्षेसाठी केवळ दोन पोलिस दिले आणि त्यांना माझ्यासोबत माझ्याच गाडीतून प्रवास करण्यास सांगितले. यावेळी माझ्यासोबत कुटुंब होते. माझ्यासोबत दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स (पीएसओ) देण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र, जयपूरचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी उलट यावर मला स्पष्टीकरण दिले.'

श्रीवास्तव म्हणाले, 'दोन पीएसओ बागरु पोलिस ठाण्यात मोदींची वाट पाहत होते. नियमानुसार त्यांनी मोदींच्या गाडीतूनच प्रवास करायला हवा. आम्ही याबद्दलचे आदेशदेखील मोदींना दाखवले. ज्या व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते, त्याच व्यक्तीच्या वाहनातून पीएसओंनी प्रवास करायचा असतो. मात्र, प्रल्हाद मोदींनी पीएसओंना त्यांच्या गाडीत घेण्यास नकार दिला. पीएसओंना स्वतंत्र वाहन देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.'

दरम्यान, पोलिसांनी प्रल्हाद मोदींना एस्कॉर्ट वाहन न दिल्यामुळे त्यांनी बागरू पोलिस चौकीबाहेर बैठक मारली. अखेर पोलिसांनी नियम दाखवल्यानंतर ते दोन पीएसओसह पुढील प्रवासासाठी रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modis brother sits on dharna demanding escort vehicle at jaipur