
Heeraben Modi : मुलांवरील प्रेम, साधेपणाचे प्रतीक
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदींनी दु:ख व्यक्त केले.
हिराबेन या मुलांवरील प्रेम, साधेपणाचे प्रतीक होत्या, अशा शब्दांत पटेल यांनी आदरांजली वाहिली.
हिराबेन यांच्या साधेपणाला उजाळा
गुजरातेतील गांधीनगरमधील रायसन गावातील वृंदावन बंगल्यात पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे वास्तव्य होते. त्यांच्या शेजाऱ्यांनी हिराबेन या साधेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. पंतप्रधानांच्या मातोश्री असल्याचा बडेजाव त्यांनी कधीही मिरविला नाही,
अशा शब्दांत आठवणींना उजाळा दिला. किर्तीबेन पटेल म्हणाले, की हिराबेन यांचे गेली सात वर्षे येथे वास्तव्य होते. आम्ही दररोज भेटत असू. त्या अतिशय साध्या आणि नम्र होत्या. त्यांच्या निधनाने मला स्वत:चीच आई गेल्यासारखे दु:ख होत आहे,
असेही त्यांनी नमूद केले. धाराबेन पटेल यांनी सांगितले, की हिराबेन कुटुंबातील सदस्यांसारख्याच होत्या. पंतप्रधानांच्या मातोश्री असूनही त्या सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगल्या. सोसायटीतील सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. मुलांवरील प्रेम, साधेपणा, कष्टाळू वृत्ती आणि उच्च जीवनमूल्यांचे त्या प्रतीक होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
-भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री, गुजरात
हिराबेन मातृत्व, त्याग, तपस्या आणि भक्तीचे मूर्त स्वरूप होत्या. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
-आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात
हिराबेन भक्ती, तप आणि कर्तव्य यांचा संगम होत्या. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. त्या नेहमीच प्रेरणास्रोत राहतील.
- शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रीच्या निधनाच्या वृत्तामुळे दु:ख झाले. मातेला गमावणे म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा आधार गमावण्यासारखे आहे. ही पोकळी सदैव जाणवत राहते. मोदी व त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी.
-भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!
- फुमिओ किशिदा, पंतप्रधान, जपान
पंतप्रधान मोदींच्या लाडक्या मातोश्रींच्या निधनाच्या वृत्तामुळे दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, ही प्रार्थना! या दु:खाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे सांत्वन करतो.
-पुष्पकमल दहल प्रचंड, पंतप्रधान, नेपाळ
पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी मोदी आणि त्यांच्या कुटुंबाप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो.
-रानिल विक्रमसिंघे, अध्यक्ष, श्रीलंका
स्वत:च्या मातेला गमावण्यापेक्षा इतर कोणतेही दु:ख मोठे नाही. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबिंयाच्या दु:खात सहभागी आहे.
-शेहबाझ शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान