कृषी कायदे पूर्णपणे ऐच्छिक;पंतप्रधान मोदींचा संसदेत पुनरुच्चार

narendra-modi
narendra-modi

नवी दिल्ली - ‘‘ केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे हे बंधनकारक नसून ते पूर्णपणे ऐच्छिक आहेत. हा निर्णय सर्वजनहिताय सर्वजनसुखाय या भावनेने घेतला आहे.’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी वाटाघाटीसाठी पुन्हा एकदा पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी आज केले. विभागलेला आणि गोंधळलेला काँग्रेस पक्ष स्वतःचे आणि देशाचे भले करू शकत नाही, अशी तोफही त्यांनी यावेळी डागली. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी पुढील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार मानणारा धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. लोकसभेत मागील आठवडाभर चाललेल्या गोंधळानंतर सोमवारी कामकाज सुरळीत चालले आणि दोन दिवस रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेत सर्व पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला. महिला खासदारांच्या सहभागाची पंतप्रधान मोदींनी यावेळी विशेष प्रशंसा केली. 

धन्यवाद प्रस्तावावर केलेल्या सुमारे दीड तासांच्या भाषणात पंतप्रधानांचा भर कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि त्यावरून सुरू असलेला गदारोळ यावरच होता. राज्यसभेच्या तुलनेत पंतप्रधानांचे लोकसभेतील भाषण अधिक आक्रमक होते. काँग्रेससोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनाही लक्ष्य केले. कृषी कायद्यांवर मोदींच्या युक्तिवादाने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग करून रोष व्यक्त केला. यावेळी विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजीही झाली. 

ही योजनाबद्ध रणनीती 
कृषी कायद्यांचे समर्थन करताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे कायदे वर्षानुवर्षे कृषी क्षेत्रापुढील आव्हाने दूर करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. काँग्रेसकडून कायद्यांच्या रंगावर बोलण्यात आले त्यांनी यातील तरतुदींवर टीका केली असती तर अधिक बरे झाले असते असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले, की ‘‘ कृषी कायद्यांबाबत गोंधळ, अफवा पसरविणे ही योजनाबद्ध रणनीती आहे. परंतु तुम्हाला लोकांचा कधीही विश्वास जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे.’’ राज्यसभेमध्ये चर्चा करणे आणि लोकसभेमध्ये गोंधळ हा विरोधाभास असून विभाजित आणि गोंधळलेला पक्ष स्वतःचे आणि देशाचेही भले करू शकत नाही, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. 

चुका दुरुस्त करता येतील 
शेतकरी आंदोलनावर मोदी म्हणाले,की ‘‘ दिल्लीच्या बाहेर आंदोलनासाठी बसलेले शेतकरी आणि आंदोलक अफवांचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेचा सरकार आदर करते म्हणूनच सातत्याने चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांच्या शंका शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचा कलमवार चर्चेचा प्रयत्न असून काही त्रुटी दाखवून दिल्यास त्या दुरुस्त करता येतील.’’ वटहुकूम आला, कायदे लागू झाले. मात्र कुठेही बाजार समिती बंद झालेली नाही आणि एमएसपीही बंद झालेली नाही. उलट कायदे आल्यानंतर खरेदी वाढली असल्याचा दावा मोदींनी केला. 

कायदे गळ्यात मारले नाहीत 
ते म्हणाले, की ‘‘ जुन्या व्यवस्थेत काहीही बदल झालेले नाही आणि अतिरिक्त पर्यायी व्यवस्था मिळाली असून ती देखील ऐच्छिक आहे. त्यात कोणतीही सक्ती नाही. जिथे जास्त फायदा होईल तेथे शेतकऱ्यांनी जावे एवढेच सांगणे आहे. नवे कायदे कोणासाठीही बंधनकारक नाहीत. मागितले नसताना कायदे आणले हा विरोधकांचा  युक्तिवाद निरर्थक असून हे कायदे गळ्यात मारलेले नाहीत तर ही पर्यायी ऐच्छिक व्यवस्था आहे.’’ 

सुधारणांचे राजकारण नकोच 
‘‘ शेतीमध्ये गुंतवणूक वाढली की रोजगाराच्या संधीही वाढतील’’ असा दावा करणाऱ्या मोदींनी कृषी सुधारणा हा राजकारणाचा विषय बनू नये, असे आवाहन केले. एपीएमसी कायदा बदलला, २४ बाजार तयार केले हे कृषिमंत्री असताना शरद पवार अभिमानाने सांगत होते. आज मात्र ते एकदम उलटे बोलत आहेत त्यामुळेच संशय निर्माण होतो की शेतकऱ्यांचा संभ्रम वाढविण्यासाठी हा मार्ग निवडला आहे का? शेतकऱ्यांच्या बचावासाठीच एपीएमसी कायद्यात बदल केला जात आहे. स्पर्धा वाढल्यानंतर मंडीमधील लागेबांधे संपतील ही बाब देखील पवार यांनीच मांडली होती, असेही मोदींनी सांगितले. 

मोदी म्हणाले 
आंदोलनजीवी स्वार्थासाठी आंदोलन बरबाद करत आहेत 
आंदोलनात नक्षलवाद्यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी का? 
टोल प्लाझा, मोबाईल टॉवर तोडणे हे योग्य आहे का? 
देशाने आंदोलनकारी, आंदोलनजीवी यांच्यात फरक करावा 
आंदोलनजीवींपासून देशाला वाचविण्याची नितांत गरज 
ताबारेषेवर पायाभूत सुविधांचे काम सुरूच राहील 
यूपीएच्या काळात पायाभूत सुविधांबाबत कामे नाही 

आत्मनिर्भरता हेच सामर्थ्य 
कोरोनानंतरच्या काळात नवी जागतिक व्यवस्था आकाराला येताना दिसते आहे. यात कोण नेतृत्व करेल हे काळ ठरवेल. परंतु या स्थितीत भारत जगापासून अलिप्त राहू शकत नाही. समर्थ देश म्हणून आपल्याला पुढे यावे लागेल आणि आत्मनिर्भर भारत हाच या सामर्थ्याचा मार्ग आहे, असा दावा मोदींनी केला. कोरोनाशी दिलेल्या यशस्वी लढ्याचे श्रेय आपल्याला घ्यावेच लागेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com