
PM Narendra Modi : भाजप संसदीय पक्ष बैठकीत मोदींचा गुरूमंत्र
नवी दिल्ली - अँटी-इन्कम्बन्सी असे काही नसते. तुम्ही सर्वजण जनतेशी योग्य प्रकारे जोडले गेलात तर अशा सत्ताविरोधी भावनेचा फटका तुम्हाला बसणारच नाही. असा गुरूमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तारूढ भाजपच्या खासदारांना आज दिला.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना मोदी म्हणाले की खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जात रहावे, नियमित जनतेशी संपर्क ठेवावा हे मी सांगून थकलो आहे अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
गरीब कल्याण व सर्व वर्गांना साधणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल या बैठकीत पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खास सत्कार करण्यात आला. यापूर्वी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मोदींनी पक्षवनेत्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार रहाण्यास सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीला फक्त ४०० दिवस उरले आहेत, असे पंतप्रधान सूचकपणे म्हणाले होते. 2024 मध्ये भाजपने लोकसभेत 400 जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत भाजप खासदारांना सांगितले की आपल्या सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
याला कोणीही निवडणुकीचा अर्थसंकल्प म्हणत नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या या पहिल्या संसदीय पक्ष बैठकीला संबोधित करताना मोदींनी भाजप खासदारांना कानपिचक्याही दिल्या. ते म्हणाले की केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितल्यानुसार पंतप्रधान म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचा प्रस्ताव आहे.
भाजपला वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे असाही दावा मोदी यांनी केला. दरम्यान पंतप्रधानांनी स्वपक्षीय खासदारांना, विशेषत: शहरांमधून येणाऱ्या खासदारांना अधिकाधिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले. जी-20 परिषदेच्या पूर्वतयारी बैठकांसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी त्यांना भारतात मिळालेल्या आदरातिथ्याचे कौतुक केले आहे असेही मोदी म्हणाले.
मोदी त्रिपुरात प्रचार करणार
दरम्यान त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान येत्या 11 फेब्रुवारीला (शनिवारी) फोडणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधान 2 सभांना संबोधित करतील. दुपारी 12.45 वाजता गोमती जिल्ह्यात आणि 2.30 वाजता धलाई येथील दुसऱ्या सभेला मोदी संबोधित करणार आहेत.