PM मोदींनी 100 व्या 'किसान रेल्वे'ला दाखवला हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहे विशेष

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 December 2020

शेतकऱ्यांसाठी एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

Kisan Rail- शेतकऱ्यांसाठी एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे महाराष्ट्राच्या संगोलातून पश्चिम बंगालच्या शालीमारपर्यंत जाईल. आतापर्यंत 99 किसान रेल्वे 14 राज्यांमध्ये चालवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाहतुकीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी किसान रेल्वे सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवणे शक्य झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत म्हटलं की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे 80 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेज चेनसाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल. कोणत्याही शेतकऱ्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. उत्पादन कमी असो की जास्त, सर्व काही वेळेवर पोहोचेल. केवळ 3 किलोचे पॅकेटही रेल्वेने पाठवण्यात आले. कोंबडीची 17 डझन अंडेही याने पाठवण्यात आली. 

किसान रेल्वेद्वारे छोट्या शेतकऱ्यांना मोठा बाजार खुला होईल. सुरुवातीला किसान रेल्वे साप्ताहिक होती, पण आता रेल्वे आठवड्यातील 3 दिवस चालत आहे. अगदी कमी काळात 100 वी रेल्वे धावू लागल्याने, यावरुन स्पष्ट होतंय की याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. किसान रेल्वेमुळे खराब होणाऱ्या अन्नपदार्थांना वेळेत इतर ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे. रेल्वेमध्ये रेफ्रिजरेटेड कंटेनर असल्याने मांस, मासे आणि दूधाच्या पदार्थांचे एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी वहन फायद्याचं ठरणार आहे.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे 7 ऑगस्टला पहिल्या किसान रेल्वेचे उद्घाटन केले होते. पहिली किसान रेल्वे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील देवलालीतून बिहारच्या दानापूरपर्यंत धावली होती. आतापर्यंत 99 किसान रेल्वे चालवण्यात आल्या आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 व्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. किसान रेल्वेमुळे लोकांना फळ-भाज्या स्वस्त दरात आणि ताज्या मिळत असल्याचं सांगितलं जातं आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi flags off 100th Kisan Rail from Sangola to Shalimar