पंतप्रधान मोदींचा रामलल्लासमोर 'साष्टांग नमस्कार'; फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
Wednesday, 5 August 2020

पंतप्रधान मोदी यांचा पूजेदरम्यानचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अयोध्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचे भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्वात आधी हनुमानगढी मंदिराला भेट दिली. येथे हनुमानाची पूजा केल्यानंतर ते रामलल्लाच्या दरबारी पोहोचले. मोदींनी रामलल्लाची विधिवत पूजा केली. मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल हेही पूजेला बसल्याचं पाहायला मिळाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा पूजेदरम्यानचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोदी रामलल्लासमोर साष्टांग नमस्कार घातल्याचं दिसत आहेत.

जय श्री राम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक भूमीपूजन सोहळा संपन्न!

2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला होता. यावेळी मोदी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते. आता भगवान रामाच्या मंदिराचे शिलान्यास करणेही मोदींसाठी मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी रामलल्ला समोर साष्टांग नमस्कार घातला आहे. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला फूल चढवले आणि त्याची परिक्रमा आणि आरती केली. पंतप्रधान मोदी यांचा भगवान रामासमोर साष्टांग नमस्कार घालत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

मोदी आज सकाळी अयोध्येत पोहोचले. ते साकेत महाविद्यालय परिसरात हॅलिकॉप्टरमधून उतरले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे स्वागत केले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करण्यात आले होते. यानंतर मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या वाहनाचा ताफा हनुमानगढी मंदिरात पोहोचला. याठिकाणी मोदींनी हनुमानाची पुजा केली. यावेळी मोदींना चांदीचा मुकूट आणि हनुमानाची गदा भेट म्हणून देण्यात आली. 

जेव्हा एक 'मुस्लिम भक्त' भगवान रामाच्या दरबारात पोहोचला!

भूमिपूजनाच्या संमारभासाठी अयोध्येत गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करण्यात येत होती. शरयू तीर भगव्या रंगाचा दिसत होता. या सोहळ्यासाठी 100 पवित्र नद्याचे जल आणण्यात आले होते. तसेच 1500 पेक्षा अधिक ठिकाणांहून पवित्र माती आणण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी काही निवडक लोकांनाचा निमंत्रण देण्यात आले होते. तसेच अयोध्या परिसरात याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्यासह मोहन भागवत, आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ आणि महंत नित्या गोपालदास उपस्थित होते. सुरक्षेसाठी मोठी प्रमाणात फौजफाटा ठेवण्यात आला आहे. 

(edited by-kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi pray in front of ram lalla ayodhya ram temple