राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक, काँग्रेसच्या नेत्याविषयी बोलताना अश्रू अनावर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नवी दिल्ली- राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसलं. अनेकदा त्यांना पाणी प्यावं लागलं. राज्यसभेतील ४ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना ते भावूक झाले. नबी आझाद यांची नम्रता, देशाच्या उन्नतीची कामना त्यांना शांत बसू देणार नाही. देशाच्या विकासासाठी ते काम करत राहतील, असं म्हणत त्यांनी आझाद यांना सल्यूट केला.

काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्यासह ४ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत संबोधन केलं. गुलाम नबी आझाद यांच्याशी बोलताना त्यांनी गौरवोद्गार काढले. गुलाब नबी आझाद यांची जागा घेणारा ( विरोधीपक्षाचा नेता म्हणून) नेता त्यांची बरोबरी करु शकणार नाही. कारण गुलाब नबी आझाद यांनी कधीही केवळ आपल्या पक्षाचा विचार केला नाही, तर त्यांनी देशाच्या हिताचाही विचार केला, असं मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मी अनेक वर्ष जम्मू काश्मिरमध्ये काम केलं. त्यावेळी मी स्कूटरवरुन खूप फिरायचो. त्यांनी केवळ पक्षच नव्हे, तर देशाच्या हिताला प्राधान्य दिले. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्याच श्रेणीत पाहतो. 28  वर्षांचा कार्यकाळ मोठा असतो. मी आणि गुलाम नबी आझाद एकदा चर्चा करत होतो, यावरुन एका पत्रकाराने आम्हाला प्रश्न केला. यावर आझाद यांचं उत्तर महत्त्वाचं होतं. तुम्ही आम्हाला नेहमी वादविवाद घालताना बघता, पण आम्ही एक कुटुंब आहोत, असं ते म्हणाले.

चेन्नईत अपहरण, पालघरमध्ये जिवंत जाळले; नौसैनिक अधिकाऱ्याच्या हत्येमुळे...

मोदींनी यावेळी एक किस्सा सांगितला. गुजरातमधील यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांनी सर्वात आधी मला फोन केला. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. मी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांनी विमान उपलब्ध करुन दिलं. याकाळात आझाद पाठपुरावा करत होते. ते कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे चिंता करत होते. पद-सत्ता जीवनात येत असते, पण ते सांभाळता येणंही महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी तो खूप भावूक करणारा क्षण होता. त्यांनी मला पुढच्या दिवशी सकाळी पुन्हा करुन स्थितीची चौकशी केली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, असं मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi rajyasabha gulab nabi aazad congress bjp