ईशान्येतील हिंसाचार करणाऱ्यांचे कपडे पाहा; मोदींचा विरोधकांवर हल्ला

टीम ई सकाळ
Monday, 16 December 2019

ईशान्येमध्ये आग लावणारी मंडळी कोण आहेत, त्यांचे कपडे पाहा; त्यावरून हिंसाचार फैलावणारी मंडळी लक्षात येतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केले. 

दुमका (झारखंड) : नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येमध्ये भडकलेल्या हिंसाचारास विरोधी पक्षांची चिथावणी असून, त्यांचे कोणीच ऐकत नसल्याने त्यांनी अशी आदळआपट सुरू केली आहे. ईशान्येमध्ये आग लावणारी मंडळी कोण आहेत, त्यांचे कपडे पाहा; त्यावरून हिंसाचार फैलावणारी मंडळी लक्षात येतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कसलाही रोडमॅप नाही'
मोदी म्हणाले, 'कॉंग्रेसकडे देशाच्या विकासाचा कसलाही रोडमॅप नाही. कॉंग्रेस आणि मित्रपक्ष हिंसाचार भडकावीत असताना ईशान्येकडील लोकांनी मात्र त्याला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. कॉंग्रेसच्या कृतीमुळे संसदेमध्ये घेतले जाणारे निर्णय योग्यच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. विरोधकांनी लोकांचा कधीच विचार केला नाही, ही मंडळी केवळ त्यांच्याच विश्‍वात मश्‍गूल राहिली. येथेही मी आमच्या सरकारने केलेल्या विकासकामांचा हिशेब देण्यासाठी आलो आहे.'

देश वाचविला!
या कायद्यामुळे शेजारी देशांतील नागरिकांना भारताचे नागरिक होता येणार आहे. नागरिकत्व कायदा आणण्याचा आम्ही घेतलेला निर्णय एक हजार टक्के बरोबर आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात छळाला सामोरे जाणाऱ्या अल्पसंख्याकांचे जीवनमान यामुळे उंचावले जाणार असून, त्यांना येथे आदरही मिळेल. हा कायदा तयार करून मोदी आणि संसदेने देशाला वाचविले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा - अमितभाई मातोश्रीवर जाणार होते; फडणवीसांचा खुलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi statement on protest in northeast against cab