
PM Narendra Modi : मुस्लिम समाजातून पंतप्रधानांच्या ‘तंबी‘चे स्वागत !
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अल्पसंख्याक समाजाबाबत अनावश्यक-फालतू वक्तव्ये टाळण्याची सूचना केली त्याचे मुसलमान समाजाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.
त्याचवेळी आता याउप्परही जर भाजप नेत्यांनी मुसलमान समाजाबद्दल बदनामीकारक व अपमानास्पद विधाने केली तर तो खुद्द पंतप्रदानांचा अपमान ठरेल, असे सूचकपणे म्हटले आहे. मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत व त्यांचे हे विधान आम्ही सकारात्मक मानतो अशी प्रतीक्रिया मुस्लिम समाझ धुरिणांनी व्यक्त केली आहे.
भाजप बैठकीचा समारोप करताना पंतप्रदानांनी, पसमांदा व बोहरा समाजापर्यंत जास्तीत जास्त संपर्कसूत्रे वाढवा, अशी सूचना भाजप नेत्यांना केली होती. त्याच वेळी, गरीब मुसलमान समाजाने मते दिली किंवा दिली नाही तरी विकासाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे असेही मोदींनी बजावले होते.
यावर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कमाल फारुकी यांनी, बोर्डाच्या वतीने पंतप्रधानांच्या वक्तव्याचे स्वागत केले. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा (भाजप नेत्यांवर) परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. आता याउपरही भाजप नेत्यांनी खोटी विधाने केली तर ते पंतप्रधान मोदींचाच अपमान करतील.
अशी विधाने करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करून फारूखी म्हणाले की एखाद्या मुस्लिमानेही जर चुकीचे विधान केले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कोणत्याही हिंदूवरही तशीच कारवाई झाली पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे.
दरम्यान भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही अल्पसंख्यांकबाबतच्या पंतप्रधानांच्या टिप्पणची पुष्टी केली. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी हा संदेश पहिल्यांदाच दिलेला नाही.
पंतप्रधान सतत अल्पसंख्याक कल्याणाबद्दल बोलतात. आमच्यासाठी (भाजप) विकासाच्या मुद्यावर कोणीही अल्पसंख्याक किंवा बहुसंख्य नाही. पसमांदा मुस्लिमांसारख्या मागासलेल्या लोकांना बळ देण्याचे कामही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सतत करत आहे.
धर्मनिरपेक्ष ‘ब्रिज'च्या लोकांनीही आता मुस्लिम समाजाच्या हितासाठी उघडपणे पुढे यावे असा टोला लगावून नक्वी म्हणाले की ‘सर तन से जुदा‘ अशी विधाने करणाऱयांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे गप्प का रहातात ?
दरम्यान अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांबाबतचे मुद्दे गेली अनेक वर्षे हाताळणारे राजकीय विश्लेषक सईद अंसारी यांनी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा मोदी सरकारची एक प्रमुख घोषणा असल्याचे सांगितले. काही वाचाळवीरांमुळे साऱया भाजपवरच ‘शिक्का मारणे‘ कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे असेही अंसारी म्हणाले.