वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसच करताहेत मदत !

पीटीआय
Monday, 16 September 2019

हरियानात पावतीऐवजी गुलाब
हरियानातील अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोक राय व त्यांच्या पथकाकडूनही वाहतुकीच्या नव्या नियमांबाबत जनजागृती सुरू आहे. अंबाला छावणी परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या हाती गुलाब देत त्यांना संबंधित नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

हैदराबाद - सुधारित मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून भलामोठा दंड वसूल केला जात आहे. मात्र, हैदराबादमध्ये नेमके याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथील पोलिस कर्मचारी नियम मोडणाऱ्यांना दंड न करता त्यांना हेल्मेट, वाहन परवाना व तत्सम कागदपत्रे मिळवून देण्यासाठी साहाय्य करताना दिसत आहेत.

रचाकोंडा मुख्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाअंतर्गत हेल्मेट, वाहन परवाना, वीमा व प्रदूषणतपासणी प्रमाणपत्राशिवाय (पीयूसी) दुचाकी चालवणाऱ्यांवर सध्या कोणताही दंड आकारला जात नाही. सुधारित कायद्यानुसार या बाबी अनिवार्य असल्याने त्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, एखाद्याकडे सदरील कागदपत्रे नसतील, तर ती तातडीने मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून मदत केली जात आहे.

नव्या नियमांबाबत काही वाहनचालक अद्याप अनभिज्ञ आहेत. अशात दंड ठोठावण्याऐवजी नियमांचे पालन होण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया पोलिस उपायुक्त (वाहतूक) एन. दिव्यचरण राव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police help to break traffic rules