कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

farm law
farm lawesakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली असून वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष होण्याआधी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला आहे.

देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे कायदे मागे घ्यायला लावले - राहूल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करताच, ‘माझे शब्द लक्षात ठेवा, सरकारला शेतीविरोधी कायदे परत घ्यावे लागतील’ अशी काँग्रेस नेत्याची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. 14 जानेवारीला त्यांनी हे ट्विट केलं होत ज्याला नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधींनीही त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. शेतकऱ्यांच्या विजयाचे त्यांनी अभिनंदनही केले. 2020 मध्ये केंद्राने तीन शेती कायद्ये मंजूर केल्यापासून देशभरातील शेतकरी या विरोधात आंदोलनं करत आहेत.

सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही - नवाब मलिक

“पंतप्रधान मोंदींनी देशाला संबोधित करताना कृषी क्षेत्रात काय कामगिरी केली त्याची माहिती दिली. त्यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. वर्षभरापासून या देशातील शेतकरी लढत होते, त्यांनी आपले प्राण गमावले. शेतकऱ्यांनी प्राणांची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली. शेतकऱ्यांना खालीद आणि देशद्रोही या नावाने पुकारण्यात आलं. तरी देशातील शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. हा शेतकऱ्यांचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

“सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही. उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे त्यांना कळालं की आता या देशात परिवर्तन होणार आहे. आज जो निर्णय झालाय तो शेतकऱ्यांचा विजय आहे”, असंही ते म्हणाले.

देर आये दुरुस्त आये - अमोल कोल्हे

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना देर आये दुरुस्त आये असं म्हटलं आहे. कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी दीर्घकाळ दाखवलेला एकजुटीचा हा विजय आहे.

कृषी कायदे संसदेमध्ये रद्द करण्याची वाट पाहू - राकेश टिकैत

शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आंदोलन मागे घेणार का? असा प्रश्न आहे. त्याबाबत बोलताना राकेश टिकैत म्हणतात, ''आंदोलन सध्याच परत घेणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू ज्या दिवशी कृषी कायदे संसदेमध्ये रद्द केले जातील.'' सरकारने एमएसपीच्या सोबत शेतकऱ्यांच्या दुसऱ्या समस्यांवर देखील चर्चा करावी, असं टिकैत म्हणाले.

600 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण – विजय वडेट्टीवार

“फेर निवडणुकीत भाजपला फटका बसला. खरं तर इतका उशिर का केला कायदा रद्द करायला. 600 शेतकऱ्यांचा बळी का घेतला. हेच जर पूर्वी केलं असतं तर शेतकऱ्यांमधील उद्रेक थांबला असता. ग्रामीण भागात या सरकारविरोधात प्रचंज रोष आहे. ग्रामीण भागातील जनता पेटली आहे. या कायद्यांविरोधात जी भुमिका या आंदोलनकर्त्यांनी मांडली, आंदोलनं केली. यांना सत्तेतील कोणताही नोता भेटायला जाऊ शकला नाही”, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

“600 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचं उत्तरही केंद्र सरकारने देणं गरजेचं आहे. या मृत्यूंची जबाबदारी आपल्यावर घ्या. कायदे रद्द केल्याचं स्वागत. पण, हे कायदे करुन देशातील शेतकऱ्याला वेठीस धरलं गेलं होतं, त्याला कोण जबाबदार”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या एकतेचा हा विजय – बच्चू कडू

“या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. सरकारने नवीन धोरण तयार केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिली.

हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे – शेतकरी नेते राजू शेट्टी

“दीर्घ काळापासून हे आंदोलन सुरु होतं. येत्या 25 तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. अखेर सत्याचा विजय झाला. ज्या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे रेटलेलं होतं, शेतकरी घर दार सोडून सत्याग्रह करत होते, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनात हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही शेतकरी आपल्या मुद्यावर ठाम राहिले”, असं शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना सांगितलं.

“हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे. पंतप्रधानांनी उशिरा का होईना हा निर्णय जाहीर केला, मी त्याचं स्वागत करतो. शेवटी देश सर्वांना सोबत घेऊन चालवायचा आहे. समाजातील कोणीही एक घटक नाराज राहिला तर समाजात अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली - संजय राऊत

पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी नवीन कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'देर आये दुरुस्त आये' - मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१९ नोव्हेंबर :- गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले हे स्वागतार्ह असून देशात विविध ठिकाणी पोट निवडणुकीत भाजपला आलेलं अपयश आणि उत्तर प्रदेशसह आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय घेतला पण कुठलाही निर्णय घेतांना राज्यकर्त्यांनी एवढा उशीर करू नये. निर्णय लवकर घेतला असता तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते त्यामुळे निर्णय घेणे लवकर घेणे अपेक्षित होते. पण ठिक आहे 'देर आये दुरुस्त आये' अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Minister Dhananjay Munde
Minister Dhananjay MundeMinister Dhananjay Munde

शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश - धनंजय मुंडे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश आले. केंद्र सरकारने तिन्ही जाचक कृषी कायदे रद्द केले. हा शेतकऱ्यांच्या धैर्याने दिलेल्या लढ्याचा विजयच ! या लढ्यात बलिदान दिलेल्या शेतकरी बांधवांना नमन. किसान एकता जिंदाबाद ! जय किसान... !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com