esakal | ‘एनडीए’कडून फूट पाडण्याचे राजकारण
sakal

बोलून बातमी शोधा

‘एनडीए’कडून फूट पाडण्याचे राजकारण

सीएएसारख्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निधर्मीपणाचा बुरखा फाटला असून, त्यांना सत्तेबाहेर घालविण्यासाठी बिहारी जनतेने एकत्र यावे, असे आवाहन राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले. 

‘एनडीए’कडून फूट पाडण्याचे राजकारण

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - दिल्लीच्या मतदारांनी आपल्या मतदानातून खरा राष्ट्रवाद समोर आणला आहे. लोककल्याण हाच खरा राष्ट्रवाद आहे. सीएएसारख्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निधर्मीपणाचा बुरखा फाटला असून, त्यांना सत्तेबाहेर घालविण्यासाठी बिहारी जनतेने एकत्र यावे, असे आवाहन राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या २३ फेब्रुवारीपासून तेजस्वी यादव यांची ‘बेरोजगारी हटाव’ यात्रा पाटण्यातून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुलाखत देताना यादव म्हणाले की, बिहारमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून एनडीएकडून फूट पाडणारा अजेंडा राबविला जात असून, महाआघाडी एनडीएविरुद्ध लढण्यास तयार आहे.

यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, नितीशकुमार यांनी आत्तापर्यंत सीएए, एनपीआर आणि एनआरसीबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही. आरक्षण हटविण्याच्या मुद्द्यावरही ते बोलले नाहीत. भाजप धोरणाविरुद्ध बोलण्याची हिंमत त्यांच्यात नाही. जेडीयूने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर झाला. या वेळी नितीशकुमार यांनी केवळ राज्यात एनआरसी लागू करणार नसल्याचे सांगितले. यावरून ते किती धर्मनिरपेक्ष आहेत, हे कळते. नितीशकुमार हे धूर्त राजकारणी आहेत. एकदा एनआरसी मंजूर केला, की तो लागू केल्याशिवाय राज्यांना गत्यंतर नाही, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यानंतर ते कायद्याच्या आड राहून आवई उठवतील, असे  यादव म्हणाले. 

संसदेतील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मतदानावेळी जेडीयूमध्ये मतभेद होते. देशात सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या माध्यमातून धर्मांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला. आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा विजय देशाला संदेश देणारा आहे. सरकार पायाभूत सुविधांवर काम करीत असेल आणि सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान केली जात असेल, तर तुमचे काम कोणीही रोखू शकत नाही. लोककल्याण हाच खरा राष्ट्रवाद आहे. जात आणि धर्मावर विभागणी करणारे राजकारण  देशाला अधोगतीकडे नेत आहे, असे यादव म्हणाले.

बसची नोंद दुसऱ्याच नावावर
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी नुकतीच घेतलेली आलिशान व्होव्हो बस ही दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या यादीत नाव असलेल्या एकाच्या नावावर नोंद असल्याचा दावा संयुक्त जनता दलाचे नेते नीरजकुमार यांनी केला आहे. ‘तेजस्वी यादव हे आपल्या वडिलांचाच कित्ता गिरवीत आहेत. ते बेनामी संपत्ती जमविताना जमिनी दुसऱ्यांच्या नावावर घ्यायचे, हे बस घेतात,’ असा टोला नीरजकुमार यांनी मारला आहे. नीरजकुमार हे सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली.

loading image