कुत्री खूप चांगली; पण तिचे अनैतिक संबंध...

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

कुत्री खूप चांगली आहे. ती फक्त भूंकते आणि गेल्या तीन वर्षांत तिने कोणाचाही चावा घेतला नाही. पण, तिचे शेजारील कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते.

तिरुवनंतपुरम (केरळ): कुत्री खूप चांगली आहे. ती फक्त भूंकते आणि गेल्या तीन वर्षांत तिने कोणाचाही चावा घेतला नाही. पण, तिचे शेजारील कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते म्हणून तिला घराबाहेर काढले आहे, असा मजकूर चिठ्ठीवर लिहून मालकाने कुत्रीला घराबाहेर काढल्याची घटना येथे घडली आहे.

कुत्र्यांवर जीवापाड प्रेम करत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. शिवाय, मालकासाठी जीव देणारी कुत्रीही अनेकांनी पाहिली आहेत. परंतु, येथील एका मालकाने आपल्या पाळीव कुत्रीचे शेजारी राहणाऱया कुत्र्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून घराबाहेर काढले आहे. संबंधित वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केल्यानंतर चर्चेला उधान आले आहे.

आपल्या कुत्रीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिला चकाई येथील वर्ल्ड मार्केटच्या बाहेर रस्त्यावर सोडून दिले. शिवाय, तिच्या शरीरावर एक चिठ्ठी बांधली. रस्त्यावर बेवारस असलेल्या कुत्रीला पाहून शमीम नावाच्या महिलेने तिला सोबत घेऊन घरी गेल्या. शमीम या प्राणांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या 'पिपल फॉर अॅनिमल्स' या संस्थेच्या सदस्य आहेत. शमीम यांनी कुत्रीला घऱी आणले व तिच्या शरीरावर बांधलेली चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांना धक्काच बसला. चिठ्ठीमध्ये लिहीले होते की, 'ही कुत्री खूप चांगली आहे. तिच्या सवयीदेखील चांगल्या आहेत. तिला जास्त खायला लागत नाही. तिला आठवड्यातून पाच दिवस आंघोळ करावी लागते. ती फक्त भूंकते आणि गेल्या तीन वर्षांत तिने कोणाचाही चावा घेतला नाही. पण, तिचे शेजारील कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते म्हणून तिला घराबाहेर काढले आहे.'

दरम्यान, पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढण्याची विविध कारणे पाहायला मिळाली होती. पण, अशा प्रकारचे कारण देऊन पाळीव कुत्र्याला घराबाहेर काढण्याची ही पहिलीच घटना आहे, असे शमीम म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomeranian abandoned in Kerala owner claims it had illicit relationship