वेळ आली तिथं देव काय करी हो !

प्रकाश पाटील
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

भाजपचा झंझावात रोखायचा असेल तर विरोधकांच्या सावलीत जायला हवे. अन्यथा आपली काही धडगत नाही. ही भीती शिवसेनेच्या मनात असावी. त्यामुळेच भाजपचे शत्रू पक्ष असलेल्यांशी जुळवून घेतले तर आपल्याला किंमत मिळेल असे शिवसेनेला वाटते. शिवसेनेशिवाय काहीच अडत नाही याची जाणीव भाजपला झाली असावी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना संपूर्ण महाराष्ट्राने उजाळा दिला. एखादा माणूस आपल्यातून निघून जातो. मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. काल बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता आणि या स्मृतिदिनाच्या आदल्यादिवशी (ता.16) हीच शिवसेना, कम्युनिस्ट, तृणमूल कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या सोबत राष्ट्रपतींना नोटांबाबत निवेदन देताना संपूर्ण देशाने पाहिले. अगदी पहिल्या रांगेत शिवसेनेचे नेते दिसले.

राजकारणात पहा ना कशी गमत असते ती ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र आले तर किती लोकांच्या पोटात गोळा आला. स्वत: उद्धव ठाकरेही म्हणाले, "" जर मोदी-पवार एकत्र येतात तर नोटांच्या मुद्यावर आम्ही विरोधकांच्या शिष्टमंडळात गेलो तर काय बिघडले ?''

उद्धवसाहेब खरं आहे ! भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष हातात घालून गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ एकत्र लढले. कॉंग्रेसला हद्दपार करण्याची भाषा युतीचेच नेते करीत होते. तशा राणाभीमदेवीच्या थाटात केलेल्या जहरी टीकेने सोनिया गांधीसह पक्षाचे भलेभले नेतेही सुटले नाहीत. "ठाकरे, महाजन, मुंडे' या त्रिमूर्तीने महाराष्ट्रात कॉंग्रेसला सळो की पळो करून सोडले होते. पुढे राज्यात सत्तांतर झाले. सत्तेत युती आली. पुढे पंधरा वर्षे आदळआपट करूनही त्यांना सत्ता मिळाली नाही. ही सत्ता मिळाली (भाजप) ती 2014 मध्ये. या निवडणुकीत युती नव्हती. युती फिसकटल्याने दोघांनी एकमेकांचे जे वाभाडे काढायचे ते काढलेच. अगदी बाप काढण्यापर्यंत मजल गेली आणि महाराष्ट्राने हा तमाशा पाहिला.

राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. हे युती तुटल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजप आणि शिवसेनेचे का फाटले ? बाळासाहेब असताना का नाही तसे झाले ? हे दोन प्रश्‍न नेहमीच विचारले जातात. बाळासाहेब असतानाही युती तुटण्याचे प्रसंग काही वेळा आले पण ती तुटली नाही. त्याला कारण होते स्वत: बाळासाहेब, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भाजपचे केंद्रातील तत्कालिन ज्येष्ठ नेते. युती तुटल्यास मतांचे ध्रुवीकरण होईल आणि त्याचा कॉंग्रेसला फायदा होईल हे ही माहीत होते. बाळासाहेबांशी वाकडेपणा परवडणारा नाही याची जाणीवही भाजपला होती. युती असतानाही त्यांनी भाजपचे जे वाभाडे काढायचे ते काढलेच. त्यांनी संघालाही लक्ष्य करण्याची संधी सोडली नव्हती. 1995 ते 1999 पर्यंत भाजप तोंड दाबून शिवसेनेचा बुक्‍याचा मार खात होती. त्यांच्यामागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायही नव्हता. संघ किंवा भाजप अशा गोष्टी लवकर विसरत नाही. त्यांची सहनशक्ती इतकी असते की ते वेळ येण्याची संधी शोधत असतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबर युती केली. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचे होते. अंदाज होता पण धोका पत्करायचा नव्हता. देशात मोदी लाट आली आणि भाजप बहुमताने सत्तेवर आला. पुढे याच मोदी लाटेचा फायदा घेत विधानसभेत भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडली. स्वबळाचा नारा दिला. शिवसेना बॅकफूटवर गेली. राज्यातही सत्तांतर झाले. भाजपचा मुख्यमंत्री झाला.

ही युती तुटल्यापासून शिवसेनेने भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच भाजपनेही योग्य वेळी युती तोडून 95चे राजकारण नको असा संदेश शिवसेनेला दिला. युती झाली असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला असता. यापूर्वी सत्तेत असताना शिवसेनेमागे जाताना जी फरफट झाली ती पुन्हा भाजपला नको होती. त्यामुळेच मोदी लाटेचा फायदा उचलला आणि शिवसेनेला कोंडीत पकडले. भाजपचा झंझावात रोखायचा असेल तर विरोधकांच्या सावलीत जायला हवे. अन्यथा आपली काही धडगत नाही. ही भीती शिवसेनेच्या मनात असावी. त्यामुळेच भाजपचे शत्रू पक्ष असलेल्यांशी जुळवून घेतले तर आपल्याला किंमत मिळेल असे शिवसेनेला वाटते. पण भाजप आता खूप चिंता करीत नाही. शिवसेनेशिवाय काहीच अडत नाही याची जाणीव भाजपला झाली असावी. भूतकाळात भक्कम युती होती तशी पुन्हा ती निर्माण होण्याची शक्‍यताही दिसत नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि शरद पवार चांगले मित्र बनल्याने आपण ऐकले पडलो ही भावना शिवसेनेमध्ये निर्माण झालेली दिसते. आज बाळासाहेब, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनही नाहीत. त्यामुळे कोणाशी चर्चा करायची हाच मुद्दा आहे. ज्या कॉंग्रेसवर टीकेचे प्रहार केले. अगदी शिवराळ भाषेत समाचार घेतला त्याच कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात जाण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Patil's Blog on Shivsena's Politics