esakal | चिराग पासवान यांच्यामागे पी.के यांची बुद्धी!
sakal

बोलून बातमी शोधा

chirag-paswan

‘मोदी तुझसे बैर नही, नितीश तेरी खैर नही’ या भूमिकेतून उतरलेल्या चिराग यांना कौशल्याने पुढे करून भाजपने नितीशकुमार यांच्या जदयूची स्थिती ‘सहन होत नाही व सांगताही येत नाही’, अशी करून ठेवली आहे.

चिराग पासवान यांच्यामागे पी.के यांची बुद्धी!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करणारे लोकजनश्‍कती पक्षाचे नवे नेते खासदार चिराग पासवान यांची प्रचार रणनीती आखण्यात प्रशांत किशोर (पीके) यांची पडद्यामागून मोठी भूमिका असल्याची माहिती मिळते आहे. निकालापूर्वी पासवान यांना उघड पाठिंबा देणे परवडणारे नसल्याने किशोर यांच्यामार्फत चिराग यांची प्रचार मोहीम आखून देण्याची चाल खेळण्यात आल्याची चर्चा आहे. 

प्रसिद्ध रणनितीकार असलेले प्रशांत किशोर हेही मूळचे बिहारी आहेत. बिहारमध्ये ते जाहीरपणे कोठेही रिंगणात नाहीत. ‘मोदी तुझसे बैर नही, नितीश तेरी खैर नही’ या भूमिकेतून उतरलेल्या चिराग यांना कौशल्याने पुढे करून भाजपने नितीशकुमार यांच्या जदयूची स्थिती ‘सहन होत नाही व सांगताही येत नाही’, अशी करून ठेवली आहे. चिराग यांनी तब्बल १२ ते १३ भाजप बंडखोरांना रातोरात तिकीटवाटप केले. ही करामत एकट्या चिराग यांची नाही, अशी दिल्लीत चर्चा आहे. म्हणूनच १० नोव्हेंबरला निकाल लागल्यावर चिराग यांना ‘हातचा’ म्हणून भाजप नेतृत्वाने कुशलतेने बाजूला ठेवले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सूत्रांनी सांगितले की नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिन्दुस्तानी आवाम मोर्चाला ‘एनडीए’मध्ये स्थान दिल्याने चिराग यांचा पहिल्यांदा भडका उडाला. त्यानंतर त्यांच्याकडे पीके यांच्या टीमने रसद पुरवली व त्यानुसारच चिराग यांनी १४३ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय केला. त्यांनी सोशल मीडियावरील ताकद, बुद्धिमत्ता व संपर्कसूत्रांचे महाजाल चिराग यांच्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर निकालानंतर भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर चिराग यांना कॉंग्रेस वा राजद यापैकी कोणाकडेही जाता यावे याचीही सोय त्यांनी करून दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुनीच संकल्पना नव्या नावाने
प्रशांत किशोर यांनी स्वत:चा पक्ष बनवतेवेळी ‘टीके १०’ मिशन ही निवडणूक प्रचारमोहीम आखली होती. त्यांचा पक्ष बाळसे धरू शकला नाही तरी आता तीच संकल्पना चिराग यांनी ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ या नावाने जशीच्या तशी उचलल्याचे दिसते. बिहारला देशातील नंबर वन राज्य बनविण्याची स्वप्ने दाखविण्याची ही योजना आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा