esakal | मराठ्यांना व्यवसायासाठी अवघा मुलूख आपला...
sakal

बोलून बातमी शोधा

World

मराठ्यांना व्यवसायासाठी अवघा मुलूख आपला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संभाजी ब्रिगेड या संघटनेने आतापर्यंत इतिहास, आरक्षण या विषयात आक्रमकपणे भूमिका घेतल्या. मात्र, जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या युवकांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी गावाच्या, राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडावे आणि जग फिरावे, जग जिंकावे, असा विचार करून या संघटनेने मार्गक्रमण करायला सुरवात केली आहे. याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडलेली भूमिका...

भारताच्या समृद्धीचे व प्रगतीचे जगाला आकर्षण होते. त्यामुळे आपला देश कायम लुटला गेला. आक्रमक लोक येथे येऊन लूट करून गेले. पण, आज भारतात लोकसंख्या, दारिद्र्याचे प्रमाण, बेरोजगारी, शेतीतील नापिकी किंवा शेतातील तोटा यातून आर्थिक विवंचना ही मूळ समस्या आहे. समस्यांचे मूळ कारण हे आर्थिक विवंचना आहे. नोकरी मिळत नाही. म्हणजे एकप्रकारे सर्वांचे अर्थकारणच कोलमडले आहे.

देशात १९९० मध्ये मंडल कमिशन लागू झाले. त्याच्याकडे सर्वच लोक आरक्षणासाठी आकर्षित झाले. १९८० पासून मराठा संघटना उभ्या राहिल्या. त्यांनी आरक्षण हाच विषय प्रामुख्याने पुढे घेतला. सुरवातीला ते आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र, त्यानंतर त्यांना आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. संपूर्ण चळवळीचे केंद्रबिंदू आरक्षण झाले. पण, त्याच वेळी १९९१ मध्ये भारत सरकारने जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जगाचे व्यापारासाठीचे दरवाजे खुले झाले. १९९० मध्ये भारताचा जीडीपी चीनपेक्षा मोठा होता. भारत व्यापारामध्ये चीनपेक्षा प्रगतशील होता. साम्यवादी असूनही चीनने धोरणात बदल केले. भांडवलशाहीचे स्वागत केले. आणि त्यांनी जगातील एकूण व्यापारात आपला वाटा २८ टक्क्यांपर्यंत नेला. एकंदर संधी म्हणून चीनने जागतिकरणाकडे पाहिले.

आपल्या देशातील सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, जाट, अग्रवाल या समाजांनी स्वतःला व्यापारामध्ये झोकून दिले. हे सर्व लोकही जमीनदार आणि लढवय्ये आहेत. शेती करणारे हे लोक व्यापाराकडे वळले. तसं मराठा समाजाचे झालेलं नाही. मी महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनाच मराठा समाज समजतो. मी माझी व्याख्या स्पष्ट केली आहे की, जे मराठी बोलतात आणि महाराष्ट्राबाहेर ज्यांना मराठी म्हणून ओळखतात. आपण खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकरले. त्यामुळे आपण उद्योग व व्यवसायासाठी जगभर बाहेर पडले पाहिजे. कारण, स्थलांतरित लोकांनी प्रगती झालेली आहे. गुजराती, मारवाडी हे व्यापारासाठी स्थलांतरित झाले आहेत. मराठ्यांनी या देशावर १५० वर्षे राज्य केले. पण, त्यांची आर्थिक प्रगती झालेली नाही. त्यांच्याकडे व्यावसायिकता आलेली नाही.

मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे, असा विचार आम्ही मांडला. त्यासाठी ‘नवी दिशा नवे विचार’ हे स्लोगन तयार केले आहे. आपण ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूख आपला’ ही भूमिका मांडली. त्याचे मुख्य कारण हे आहे की, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये पंजाबी आणि जाट लोकांची संख्या जास्त आहे. लंडन आणि अमेरिकेतही ती परिस्थिती आहे. तेथे त्यांनी ‘कम्युनिटी लिव्हिंग’ सुरू केले आहे. ते तेथे नातेवाईक घेऊन जातात आणि तेथे सुरक्षित होतात. ६ जून १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची संकल्पना मांडताना, ‘अहद तंजावर अहद पेशावर अवघा मुलूख आपला’ ही भूमिका मांडली. त्यावेळी आदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही, मोगलशाही यांच्या ताब्यात असलेला हिंदुस्थान माझ्या ताब्यात येणार, ही संकल्पना त्यांनी मांडली. आम्हाला कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे लोकांच्या मनावर बिंबवायचे आहे. त्याचे कारण की, भारताच्या तुलनेने कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ जास्त आहे. लोकसंख्याही कमी आहे. तेथे विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय आणि नोकरी याची प्रचंड संधी आहे.

जाट, पंजाबी, गुजराती, तमीळ, मलबारी यांची संख्या परदेशात मोठी आहे. ते फक्त तेथे गेले नाहीत, तेथून ते मायदेशी पैसे पाठवतात. त्यातून येथील जीवन समृद्ध होत आहे. त्यातून आपल्या देशाचे अर्थकारण मजबूत होईल. आखाती देशांमध्ये ४५ लाख लोक केरळी आहेत. त्यांनी २०१४ मध्ये सात लाख कोटी रुपये आपल्या देशात पाठवले. तेही फक्त बॅंकेमार्फत. त्यामुळे आपल्या लोकांनी उद्योग व रोजगाराविषयी जगात जावे. आपण कार्यकर्त्यांना सांगितले की तोडा की तोडतात आणि जोडा म्हटले की जोडतात. तुम्ही तोडायची भाषा केली की ते तोडतात, पण त्याचे काय परिणाम आपल्याला भोगायला लागले? त्यांना दिशा नाही. त्यांना आम्ही ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा’ हे सांगत आहोत.

आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न

परदेशात गेलेल्यांची अर्थकारण प्रचंड झालेले आहे. मराठा ही बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे. त्यांना अर्थकारण कळाले पाहिजे. हा समाज आर्थिक निरक्षर आहे. त्यामुळे प्रगतीत अडचणी आहेत. आर्थिक असाक्षर असल्यामुळे त्यांना योग्य गुंतवणूक करता येत नाही. शेअर मार्केट कळत नाही. बिझनेसला अनेक पर्याय आहेत. त्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • मराठा ही बिझनेस कम्युनिटी झाली पाहिजे, असा विचार मांडला आहे.

  • कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी व व्यवसायाची मोठी संधी आहे.

  • अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा (Jobs Abroad) आणि Gulf मराठा Community (Jobs Abroad) या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार.

छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनीही चळवळी अर्थकारणाकडे व व्यवसायाकडे वळविल्या. त्यांनी उद्योग व्यवसाय उभे केले. सयाजीराव गायकवाड हे त्यांच्यासोबत लोकांना परदेशात घेऊन जायचे व त्यांना युरोपची ओळख करून द्यायचे. त्यानुसार आमच्या संघटनेचे परदेशातील प्रतिनिधी तेथे असलेल्या संधींची माहिती देतात आणि आम्ही त्या सोशल मीडियावर देत आहे. जगाची ओळख करून देण्याचे काम सुरू आहे.

- प्रवीण गायकवाड

(शब्दांकन : नीलेश शेंडे)

loading image
go to top