नितीश यांच्याकडेच निवडणुकीची धुरा; पुन्हा विजय मिळविण्याबाबत विश्‍वास

उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना अध्यक्ष नड्डा यांनी नितीशकुमार हेच आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, हे स्पष्ट केले. विरोधकांजवळ कोणतीही दिशा नाही आणि विचारही नाही..

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज जाहीर केले. तसेच, भाजप, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

बिहार भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज समाप्त झाली. समारोपाच्या सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना अध्यक्ष नड्डा यांनी नितीशकुमार हेच आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, हे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. ‘विरोधकांजवळ कोणतीही दिशा नाही आणि विचारही नाही. जनतेची सेवा करण्याचीही इच्छा त्यांच्याकडे नाही. नितीशकुमार यांचा जेडीयू, पासवान यांचा लोजपा आणि भाजप हे पक्ष ज्यावेळी एकत्र येतात, त्यावेळी विजय निश्‍चित मिळतो. यावेळीही आम्ही एकत्रच लढणार आहोत आणि यात यशस्वीदेखील होऊ,’ असे नड्डा म्हणाले. सध्या जेडीयू आणि लोजपामध्ये वाक्‌युद्ध सुरु असताना नड्डा यांनी ही एकीची भाषा केली आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी लोजपाचे नेते खासदार चिराग पासवान हे सातत्याने करत आहेत. पूरस्थितीवरूनही चिराग यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे जेडीयूचे नेतेही चिराग यांच्यावर जाहीर शरसंधान करत आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नड्डा म्हणाले की, आपल्याला जनतेपर्यंत पंतप्रधान मोदींचा संदेश आणि नितीशकुमारांनी केलेले कामही सर्वांपर्यंत न्यायचे आहे. नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली आपण पुढील निवडणूक लढणार आहोत. आपल्याला पूर्ण ताकद लावून लढायचे आहे. विरोधक खालच्या स्तरावरील राजकारणातून वर येऊ शकत नाहीत. त्यामुळेच जनतेचे लक्ष्य आपल्या आघाडीकडे आहे. केवळ भाजपच नाही तर, सहकारी पक्षांनाही मजबूत करण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर आहे, असेही नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक ठरल्या वेळीच होणार
नवी दिल्ली : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ठरलेल्या कालावधीतच होईल, असे निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. कोरोनामुळे काही राजकीय पक्ष ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती सांगण्यात आली आहे. २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर या काळातच निवडणूक होण्याचा अंदाज आहे. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने संसर्गाच्या काळात निवडणूक घेण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय इतरही काही पक्षांनी ही मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Nadda clarified that Nitish Kumar will be the face of the CM post