Presidential election draupadi murmu announced by bjp for the post of president new delhi
Presidential election draupadi murmu announced by bjp for the post of president new delhisakal

द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी विजय सोपा; आकड्यांचं गणित काय सांगतं?

भाजपकडे सात लाख मतमूल्य निश्‍चित; ‘बीजेडी’, ‘जेडीयू’चाही पाठिंबा

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तो २१ जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. भारताच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या व त्याही महिला नेत्या विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सध्याच्या बलाबलानुसार मुर्मू निवडून आल्या तर स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरतील. भाजपकडे जवळपास साडेसहा- सात लाख मते पक्की मानली जात आहेत व निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त पाच लाख ४० हजार मते आवश्यक असतात. रायरंगजंगच्या रहिवासी द्रौपदी मुर्मू (वय ६४) व विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच हजारीबागचे माजी खासदार यशवंत सिन्हा या दोघांचेही झारखंडबरोबर घट्ट नाते असल्याने अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात निर्माण झालेले हे छोटे आदिवासी बहुल राज्य अचानक चर्चेत आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने झारखंडच्या माजी राज्यपाल व ओडिशातील ज्येष्ठ पक्षनेत्या द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) राज्यसभेत साथ देणारे बिजू जनता दलासारखे (बीजेडी) पक्ष पहिल्या झटक्यात आपल्या बाजूला वळवून घेतलेच शिवाय आम आदमी पक्षासारख्या अनेक पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘अग्निपथ’सारख्या योजनेला विरोधाची भूमिका घेणारे नितीशकुमार यांच्यासारखे नेते पहिल्या फटक्यात मुर्मू यांना पाठिंबा देतात ही सूचक घडामोड मानली जाते. मुर्मू या दिल्लीत शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘एनडीए’मधील वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भाजपचे राजकीय गणित

राष्ट्रपतिपदाच्या निवडीमागील भाजपची राजकीय गणितेही स्पष्ट आहेत. पुढील दोन वर्षांत १८ राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. यातील गुजरातसह किमान पाच राज्यांत अनुसूचित जमाती व आदिवासी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र व झारखंड या राज्यांतील विधानसभेच्या ३५० हून जास्त जागांवर आदिवासी समाजाचा वरचष्मा असल्याचे मानले जाते. गुजरातमध्ये तर राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी आदिवासी समाज मोठी भूमिका बजावतो. मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे हा या समाजाला मोठा संदेश दिला, असे होईल.

लोकसभा निवडणुकीची तयारी

देशभरात अनुसूचित जमातीचे ८.९ टक्के मतदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची गणितेही यामागे आहेत. उज्ज्वला सारख्या योजनांमुळे ग्रामीण व गरीब वर्गातील महिला भाजपच्या मागे आहेत. मात्र राजकीय जाणकारांच्या मते मोदी- शहा कोणताही धोका पत्करत नसल्याने महिला राष्ट्रपती बनणे या एका घटनेने देशभरातील महिला वर्गाला मोठा सकारात्मक संदेश मिळू शकतो. काँग्रेसने २००९ च्या निवडणुकीत या ‘फॅक्टर’ चा लाभ घेतलेला आहे. लोकसभेतील ४७ जागांवर आदिवासी व अनुसूचीत जातींचे खासदार निवडून येतात. सध्या यातील तब्बल ३१ जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

संख्येचे गणित

  • ५,३९,४२० - निवडून येण्यासाठी मुर्मू यांना आवश्यक ती मते

  • ५,२६,४२० - भाजप आघाडीकडे सध्या मतांचे बळ

  • ३१,००० - बिजू जनता दलाची मुर्मू यांना मिळणारी मते

  • ४३,००० - जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस कडील मतमूल्य

  • २०,००० - झारखंड मुक्ती मोर्चाला मुर्मू यांना मत द्यावे लागल्यास त्यांची मते

(आम आदमी पक्ष, तेलुगू देशम, अकाली दल यासारख्या पक्षांची मते सध्या गृहीत धरलेली नाहीत.)

निवडणुकीचा कार्यक्रम

  • २४ ते २९ जून - उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत

  • १८ जुलै - मतदान

  • २१ जुलै - निवडणुकीचा निकाल

  • २४ जुलै - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल समाप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com