उपेरबेडात साजरी झाली दिवाळी

राष्ट्रपती निवडणूक: विजयानंतर द्रौपदी मुर्मूंच्या गावात जल्लोष
Presidential election Draupadi Murmu's victory celebrate tribal village of Uperbeda in Odisha
Presidential election Draupadi Murmu's victory celebrate tribal village of Uperbeda in Odishasakal

भुवनेश्‍वर : ओडिशातील उपेरबेडा या आदिवासी गावांत आज सकाळपासूनच आनंदी वातावरण होता. ‘ओडिशा कन्ये’चा संपूर्ण गावाला अभिमान वाटत असून ‘आपली मुलगी’ भारताच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्याचा आनंद प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर होता. मुर्मू यांच्या विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ लोकलावंतांनी पारंपरिक वेषात रस्त्यावर येऊन आदिवासी नृत्य केले, गाणी म्हटली. भुवनेश्‍वरपासून २८० किलोमीटर अंतरावरील या दुर्गम गावात भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. तेथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयोत्सवाची सर्व तयारी आज मतमोजणीपूर्वीच झाली होती. मिठाई वाटपासाठी साडेचार क्विंटलचे २० हजार लाडू तयार करण्यात आले होते. २५ हलवायांनी मिळून विविध प्रकारचा मिठाई तयार केली होती. ‘‘द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानिमित्त लाडू तयार करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटत आहे, असे हलवायाने सांगितले. ‘ओडिशातील आदिवासी कुटुंबातील मुलगी राष्ट्रपती झाली, हे केवळ आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी गौरवास्पद आहे, अशी भावना एका ग्रामस्थाने व्यक्त केली.

मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूरहून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या उपेरबेडा या मूळ गावी मुर्मू यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यांच्या वडिलांच्या या घरात त्यांचे भाचे दुलाराम तुडू हे राहत आहेत. रायरंगपूरमधील व्यापारी संघटना, बार असोसिएशन, धार्मिक व शैक्षणिक संस्था व सरकारी अधिकारीही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आतुर झाले होते. त्यांच्या सासरी पहाडपूर गावातही उत्साहाचे वातावरण होते. रायरंगपूरमध्ये मेजवानीचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलकही लागलेले होते. अनेक भाग विद्युत रोषणाईने झगमगत होते. द्रौपदी मुर्मू या सुरुवातीच्या काळात शिक्षिका असलेल्या अरविंद पुर्नांनगा शिक्षकेंद्र या शाळेत व भुवनेश्‍वरमधील रमादेवी विद्यापीठात जेथे त्यांचे शिक्षण झाले तेथे उत्साह ओसंडून वाहत होता.

विरोधी १७ खासदारांचे क्रॉस व्होटिंग?

मुर्मू यांना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या १७ खासदारांनीही मतदान केले, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला. मुर्मू यांना पहिल्याच फेरीत ५४० खासदारांची मते मिळाली व हा आकडा एनडीएच्या अपेक्षित मतांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुर्मू यांना अतिरिक्त १७ मते याच फेरीत पडली. याचाच अर्थ विरोधी पक्षांच्या १७ खासदारांनीही भाजप उमेदवाराला सरळ सरळ मतदान केले असा होतो, असा दावा भाजपने केला. भाजपला ५२३ मते मिळणे अपेक्षित होते.

आधीच अभिनंदनाचा वर्षाव

दुसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण होताच भाजप नेत्यांनी मुर्मू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. मुर्मू यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरेल असा विश्वास भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्यासह अनेक मंत्र्यांनीही विजयाची घोषणा होण्यापूर्वीच मुर्मू यांच्या अभिनंदनाचे ‘ट्विट’ केले.माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरून मुर्मू यांचे विजयाआधीच अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, आदिवासी समाजातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्चपदापर्यंत पोहोचणे हा त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी व देशासाठीही अत्यंत गौरवाचा विषय आहे. मुर्मू यांचा विजय हा त्यांच्या संघर्षाचा विजय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल असेही प्रसाद यांनी म्हटले.

असाही योगायोग....!

द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. हा मान सर्वप्रथम महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील यांना मिळाला होता. पाटील या देशाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. पाटील आणि मुर्मू यांची राष्ट्रपतिपदी निवड जाहीर होण्याचा दिवसही योगायोगाने एकच (२१जुलै) आहे. २००७ मध्ये यूपीएच्या उमेदवार पाटील यांच्या राष्ट्रपतिपदी विजयाची घोषणा याच दिवशी झाली होती. त्यांनी त्या वर्षी २५ जुलै रोजी शपथ घेतली होती. मुर्मू यांचाही शपथविधी २५ जुलै रोजीच होणार आहे.

शिकून तुम्ही काय करणार, असे आम्हा मुलींना त्यावेळी विचारले जात असे. द्रौपदीला विचारायचे जायचे की काय करू शकते. आज ती काय करू शकते, हे तिने आज दाखवून दिले आहे. तिने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्याचेच फळ आज तिला मिळाले आहे. ती खूप नम्र आहे. सुखदुःखात आम्ही दोघी कायम एकत्र होतो. मी तिची काकू असले तरी तिच्यापेक्षा लहान आहे. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ती जेव्हा घरी येते तेव्हा कुटुंबातील मुलांसाठी नेहमी चॉकलेट आणते.

- सरस्वती, द्रौपदी मुर्मू यांची काकू

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बनल्या ही आदिवासी समाज, ओडिशा व संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.’’

- तारिणीसेन तुडू, मुर्मू यांचे भाऊ

मी बारावीतील विद्यार्थिनी आहे. द्रौपदी मुर्मू या आमच्या गावातील आहे. रायरंगपूर गावातील सर्व विद्यार्थ्यांचा त्या आदर्श आहेत’’

- शालिनी मुर्मू, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com