
देशाला रबरस्टँप राष्ट्रपती नको : यशवंत सिन्हा
बंगळूर - राष्ट्रपती हा राज्यघटनेचा निःपक्षपाती संरक्षक असावा, तो ‘रबर स्टॅम्प'' नसावा. द्रौपदी मुर्मू यांनीही संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यावी, असे आवाहन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केले.
रविवारी काँग्रेस नेते आणि आमदारांची भेट घेतल्यानंतर बंगळूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी राज्यघटनेला उत्तरदायी राहण्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षांच्या सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन लोटस’ अपमानास्पद बिगरलोकशाही पद्धतीने राबवीत आहे, असा आरोप करून त्यावर अंकुश ठेवण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात या तंत्रांचा वापर करून सरकारे पाडण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. पण, देशातील सध्याच्या परिस्थितीत मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी संविधानाच्या रक्षणाबद्दल देशातील लोकांना आश्वासन द्यावे आणि अशीच प्रतिज्ञा करावी.
ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षांची उमेदवारी स्वीकारण्यामागचा एकमेव उद्देश संविधान आणि त्याच्या उदात्त मूल्यांचे रक्षण करणे आहे. सत्ताधारी यंत्रणेने लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर वारंवार हल्ले सुरू केले आहेत, जे आपल्या प्रजासत्ताकाची मूलभूत तत्त्वे आहेत. भारताच्या बहुधार्मिक समाजात फूट पाडण्यासाठी त्यांनी विषारी जातीयवादी प्रचार केला आहे.
कर्नाटकातील सत्ताधारी भाजप भगवे अभ्यासक्रम सुरू करून तरुण पिढीची मने जातीयवादी करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकचा समृद्ध आध्यात्मिक वारसा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे मला त्याच्याबद्दल खूप कौतुक आहे. बसवण्णा, कनकदास, कुवेंपू आणि डॉ. राजकुमार यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
Web Title: Press Conference Of Yashwant Sinha Joint Candidate Of Opposition In Presidential Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..