esakal | सत्तेसाठी दोन-दोन युवराजांची धडपड; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

bihar-election-2020

समस्तीपूर येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, बिहारमध्ये एका बाजूला एनडीए सरकार लोकशाहीला बांधिल आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधातील आघाडी घराणेशाहीच्या राजकारणात गुरफटलेले आहेत.

सत्तेसाठी दोन-दोन युवराजांची धडपड; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

sakal_logo
By
पीटीआय

समस्तीपूर - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच सभांचा धडाका लावला. पुलवामा प्रकरणावरुन टीका करतानाच मोदींनी काँग्रेस- राष्ट्रीय जनता दल आघाडीचे दोन ‘युवराजां’ सत्तेवर येण्यासाठीची धडपड, असे वर्णन केले. खराब अन्नामुळे अपचन झाल्यावर आपण ते परत कधी खात नाही, त्याप्रमाणे ‘राजद’च्या सत्तेचा अनुभव घेतल्यावर आता पुन्हा त्यांच्या वाटेला जाऊ नका, असे आवाहन करत मोदींनी एनडीएला पुन्हा सत्ता देण्याची जनतेला विनंती केली.  

पंतप्रधान मोदींनी आज छपरा, समस्तीपूर, मोतीहारी, बगहा आणि चंपारण येथे सभा घेतल्या. समस्तीपूर येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले,‘‘ बिहारमध्ये एका बाजूला एनडीए सरकार लोकशाहीला बांधिल आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधातील आघाडी घराणेशाहीच्या राजकारणात गुरफटलेले आहेत. नितीशकुमारांनी आपला एखादा नातेवाईक राज्यसभेवर पाठविल्याचे किंवा माझा कोणी नातेवाईक संसदेत असल्याचे तुम्ही ऐकले तरी आहे का? बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आघाडी म्हणजे दोन युवराजांची आघाडी असून त्यांना आपापली सिंहासने राखायची आहेत. एका बाजूला राज्यात एनडीए सरकारच्या डबल इंजिनामुळे विकासाचा धडाका असून दुसऱ्या बाजूला दोन युवराजांची सत्तेसाठी धडपड सुरु आहे. यातील एका जणाला उत्तर प्रदेशात अपयश मिळाले होते. तरीही तो आता बिहारमधील जंगलराजच्या युवराजाच्या मदतीला आला आहे. ते येथेही अपयशी ठरतील.’’ 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुलवामा प्रकरणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याची कबुली शेजाऱ्यांनीच दिली. यामुळे विरोधकांच्या चेहऱ्यावरील मास्क उतरला आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बिहारच्या अनेक सुपुत्रांशी यांना काहीही देणेघेणे नाही. त्यांना राजकीय फायदे उकळायचे आहेत, असा दावा करतानाच मोदींनी ‘अशा लोकांपासून सावध राहा’, असा सल्लाही दिला. आगामी छटपूजेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी भावनिक सादही घातली. छट महोत्सव आपल्याला परवडेल का, याची चिंता मातांनी करू नये, दिल्लीत बसलेला तुमचा हा पुत्र तुमच्या सर्व गरजांची काळजी घेईल, असे मोदी म्हणाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी उवाच...
    काँग्रेस पटेलांना विसरली 
    विरोधक नैराश्‍याच्या गर्तेत
    ‘राजद’ने रघुवंशप्रसाद या आपल्या नेत्यावरच अन्याय केला
    विरोधकांचा डोळा सत्तेकडे

विधानसभा निकालानंतर नितीशजी हे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राजदबरोबर कधीही हातमिळवणी करू शकतात. ते पुढील लोकसभा निवडणुकीत थेट मोदींनाही आव्हान देऊ शकतात. आम्ही मात्र भाजपशी प्रामाणिक आहोत. 
- चिराग पासवान, अध्यक्ष, लोजप

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या १५ वर्षांत राज्यात ६० मोठे गैरव्यवहार झाले. नितीश सरकारने कायमच शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सिंचन याकडे दुर्लक्ष केले आहे. 
- तेजस्वी यादव, राजद नेते

loading image