बंगालमध्ये दुर्गापुजेसाठी भाजप सरसावला; पंतप्रधान मोदीही सहभागी होणार

वृत्तसंस्था
Friday, 16 October 2020

अमित शहा यांनी कोलकत्यामध्ये सॉल्टलेक येथे दुर्गा पूजा केल्याने राजकीय वादंग निर्माण झाला होता.विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरण्याची शक्यता आहे

कोलकता - यंदाही दुर्गा पूजेच्या निमित्ताने पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोलकत्यामध्ये सॉल्ट लेक येथे दुर्गा पूजा केल्याने राजकीय वादंग निर्माण झाला होता. यंदा विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकीय श्रेयवादाच्या या लढाईमध्ये सध्या तरी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ममतादीदींनी यंदा दहा जिल्ह्यांत व्हर्च्युअली ६९ दुर्गा मंडळांचे बुधवारी उद्‌घाटन केले. पुढील दोन दिवस हे उद्‌घाटन सोहळे रंगण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुर्गा पूजेत सहभागी होणार आहेत, भाजप महिला मोर्चाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यावेळी ऑनलाइन पद्धताने राज्यातील जनतेशी देखील संवाद साधणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पारंपरिक पद्धतीने दुर्गा मंडपांची सजावट करण्यात येईल. भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा हे यावेळी चंडी पाथचे सादरीकरण करणार असल्याची चर्चा होती पण तृणमूलने पात्रा यांना याआधीच त्यांना बाहेरचे ठरविले असल्याने त्यांचा हा कार्यक्रम बारगळू शकतो.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपची स्वतःची मंडळे 
यंदा भाजपने जुन्या दुर्गा मंडळांमध्ये जाण्याऐवजी स्वतःची मंडळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आमचा पक्ष दुर्गा पूजेमध्ये थेट सहभागी होणार नाही पण सांस्कृतिक विभागाच्या महिला आघाडीने त्याचे आयोजन केल्यास आम्ही त्याचे स्वागत करू अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या निमित्ताने नेहमीच राजकीय धुळवड रंगत असते. मागील दहा वर्षांच्या काळामध्ये तृणमूलने जवळपास सगळ्याच दुर्गा मंडळांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता भाजपला देखील ही मंडळे खुणावू लागली आहे आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वादाची पार्श्वभूमी
मागील वर्षी देखील भाजपने दुर्गा मंडळ आणि पूजाविधीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नव्हता. कोलकत्यातील दोन दुर्गा मंडळांतून तृणमूलच्या दबावामुळे भाजप नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तृणमूलने मात्र भाजपचे हे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर अमित शहा यांनी बी जे ब्लॉक सॉल्ट लेकमध्ये दुर्गा पूजन केले होते. यावरून देखील आयोजक आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये मोठा वाद झाला होता. तृणमूलच्या ताब्यात असलेल्या महापालिकेने दुर्गा मंडळाच्या सुविधा थांबविण्याची धमकी दिली होती, असा आरोप भाजपने केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi will also participate Durga Puja in Bengal