Video :...आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

जमिनीच्या वादातून दहा जणांची क्रूर हत्या झालेल्या सोनभद्रकडे जाण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी शुक्रवारी अडवले आणि ताब्यात घेतले. 

लखनौ : जमिनीच्या वादातून दहा जणांची क्रूर हत्या झालेल्या सोनभद्रकडे जाण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी शुक्रवारी अडवले आणि ताब्यात घेतले. 

पोलिसांनी सोनभद्रकडे जाताना अडवल्यावर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मिर्झापूर येथे चक्क रस्त्यावरच बसून आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्यांच्याभोवती सुरक्षा रक्षकांनी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कडे केले. 

त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एका गेस्ट हाऊसवर केली. आपल्याला कोणत्या कायद्या नुसार अडवले आहे? असा प्रश्‍न प्रियांका गांधी यांनी पोलिसांना केला. 

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या प्रभारी आहेत. उत्तर प्रदेशातील सोनभद्र गावात जमिनीच्या वादातून दहा जणांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या 24 रुग्णांना वाराणसी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे. 

प्रियांका गांधी शुक्रवारी सकाळ विमानाने वाराणसीत दाखल झाल्या. त्यांनी रुग्णालयात जाऊन सोनभद्र हत्याकांडातील जखमींची भेट घेतली आणि जखमींची विचारपूस केली. वारणसीहून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनभद्र गावाला भेट देण्यासाठी त्या सकाळी दहाच्या सुमारास निघाल्या. पोलिसांनी प्रियांका गांधी यांचा वाहनाचा ताफा रस्त्यातच अडवला. 

मिर्झापूरजवळ रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. तेव्हा पोलिसांनी त्यांना काही वेळाने ताब्यात घेतले आणि एका गेस्ट हाऊसमध्ये त्यांना नेऊन ठेवले. प्रियांका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "मी सोनभद्र येथे जाऊन तेथील लोकांना भेटणारच आहे. त्याशिवाय मी येथून परत जाणार नाही.'' 

राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींना पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेतले त्याबद्दल ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांना अटक केल्या मुळे संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाकडून तीव्र  निषेध होत असताना अमरावती काँग्रेस कमिटीच्या वतीने इर्विन चौकात भाजप सरकार विरोधी घोषणा देत तीव्र शब्दामध्ये  निषेध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi sitting on road