राफेल गैरव्यवहार प्रकरणी संसदेबाहेर काँग्रेसची निदर्शने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेबाहेर राफेल गैरव्यहाराप्रकरणी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विशेष समिती नेमून राफेल प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. राफेल गैरव्यवहार ते तिहेरी तलाक अशा सर्व विषयांवर राज्यसभेत आज सरकारला विरोधी पक्ष सवाल करेल. 

नवी दिल्ली : राज्यसभेत आज (ता. 10) तिहेरी तलाकसंबंधित विधेयक सादर केले जाणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केले आहे. सकाळपासूनच भाजपचे वरिष्ठ नेते राज्यसभेत उपस्थित आहेत. यात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नक्वी हे नेते उपस्थित आहेत, तर काँग्रेस नेत्यांनी संसदेबाहेर निदर्शने केली.

मान्सून सत्राचा आज शेवटचा दिवस असून, राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश यांचा आज पहिलाच दिवस आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेबाहेर राफेल गैरव्यहाराप्रकरणी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विशेष समिती नेमून राफेल प्रकरणाची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. राफेल गैरव्यवहार ते तिहेरी तलाक अशा सर्व विषयांवर राज्यसभेत आज सरकारला विरोधी पक्ष सवाल करेल. 

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशील गुप्ता व इतर नेत्यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. तिहेरी तलाक विधेयकावर आम्ही तटस्थ राहू, पण राफेल डील संबंधित चौकशी व्हायलाच पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. 

काँग्रेससह सीपीआय, आरजेडी व आपच्या नेत्यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest behind sansad bhavan by congress