
पंजाब: शिवसेना- शीख संघटनेत संघर्ष; दगडफेक करत पोलिसांवर तलवार हल्ला
पंजाबमधल्या पटियाला भागात आज शिवसेना आणि शीख संघटना आमनेसामने आल्या आहेत. शिवसेनेने खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या विरोधात काही शीख युवकांनी शिवसैनिकांना माकड सेना म्हणत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
काली माता मंदीर परिसरातही तणाव निर्माण झाला. शिवसेना आणि शीख संघटनांमध्ये दगडफेकही झाली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना १५ वेळा हवेत गोळ्याही झाडाव्या लागल्या. या सगळ्या गोंधळामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी समर्थकांनी तलवारीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली आज खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्यात आला होता. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. हरिश सिंगला म्हणाले की शिवसेना कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही आणि कोणाला खलिस्तानीचं नावही घेऊ देणार नाही.
सिंगला यांनी सांगितलं की, सिख फॉर जस्टिसचे कन्वीनर गुरपतवंत पन्नू यांनी २९ एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही २९ एप्रिललाच खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्याचं जाहीर केलं होतं. या मोर्चाबद्दल माहिती मिळताच खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले होते.