'गाफील राहू नका'; सिंग यांनी अमित शहांना दिला इशारा

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

पंजाबच्या तरनतानर भागात काही दिवसांपूर्वी चार खलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटाचा तपास करताना याचा खुलासा झाला.

अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबच्या तरनतानर भागात काही दिवसांपूर्वी चार खलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटाचा तपास करताना याचा खुलासा झाला. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून एके-47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा करण्यात आला आहे. ही सर्व शस्त्रास्त्रे जीपीएस संचालित ड्रोनच्या सहाय्याने पाठविण्यात आली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी दहशतवादी हल्ल्या होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घ्यावी. तसेच या ड्रोनवर त्वरीत कारवाई करावी, अशी विनंती सिंग यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तान  सीमेपलीकडून ही सर्व शस्त्रे भारतात पाठवत होता. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर आपल्या देशात घातपात घडवण्याचा त्यांचा कट आहे. तसेच दहशतवादी संघनटनादेखील कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाचा बदला घेण्यासाठी 'जैश-ए-मोहम्मद'सारख्या संघटना सक्रिय झाल्या आहेत.

हाय प्रोफाईल व्यक्तींना टार्गेट बनविण्यात आल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे 'जैश'च्या हिटलिस्टवर असून त्यासाठी विशेष दहशतवाद्यांचे पथक तयार करण्यात येत आहे. देशभरातील जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनऊ यांसारख्या 30 महत्त्वाच्या शहरांतील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab CM Capt Amarinder Singh warns Union Home Minister Amit Shah about security