Bihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

भाजपा लशीच्या विषयाचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत. यातील पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासने दिली जाता आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या एनडीए आघाडीतील भाजपने आता आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ज्यात त्यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर कोरोनाची लस मोफत देण्याचा दावा केला आहे. यावर आता मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भाजपा लशीच्या विषयाचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते शशी थरुर यांनीही टीका केली आहे. 

कोरोनावरील लस जशी तयार होईल तसे लगेचच बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देण्यात येईल. आमच्या जाहीरनाम्यातील हे आमचं सर्वांत पहिलं वचन आहे. असं निर्मला सीतारामण यांनी या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीवेळी म्हटलं आहे.

भाजपच्या या आश्वासनावर टीका होत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही या आश्वासनाची खिल्ली उडवत समाचार घेतला आहे. त्यांनी निर्मला सीतारामण यांच्या हे आश्वासन देतानाच्या व्हिडीओवर ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, तुम मुझे वोट दो मैं तुम्हे वैक्सीन... पुढे त्यांनी म्हटलंय की, काय भयंकर वेडेपणा आहे हा! इलेक्शन कमिशन त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्लज्ज सरकारवर कारवाई करेल का?

ज्या राज्यात भाजपाचे सरकार नाही त्या राज्यांचे काय? म्हणजे जे भारतीय भाजपाला मत देत नाहीत त्यांना मोफत लस मिळणार नाही तर? असं म्हणत आदमी पार्टीनेही ट्विट करुन या प्रकाराचा समाचार घेतला आहे.

भारतीय जनता पार्टीने गुरुवारी बिहार विधानसभेसाठी आपला जाहीरनामा संकल्प पत्र या नावाने प्रसिद्ध केला. या संकल्पपत्रात शिक्षण, स्वास्थ्य, आयटीसहीत विविध क्षेत्रात 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच प्रत्येक बिहारवासीला कोरोनाची लस मोफत देण्याचे वचन देखील भाजपने दिले आहे. या संकल्प पत्रामध्ये पाच सूत्र, एक लक्ष्य आणि 11 संकल्प केले गेले आहेत. पक्षाने या संकल्पपत्राद्वारे पुढीच पाच वर्षांचा रोडमॅप देखील जाहीर केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question over bihar bjp promice of free vaccination if voted to power