राहुल गांधी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणार; काढणार ट्रॅक्टर रॅली

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 2 October 2020

मोदी सरकारने नुकतंच तीन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

नवी दिल्ली- मोदी सरकारने नुकतंच तीन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत. मात्र, या सुधारणांना विरोधी पक्षांचा कडाडून विरोध आहे. हे कायदे सभागृहात मंजूर होतानादेखील विरोधकांनी चांगलाच गोंधळ सभागृहात घातला होता. ज्या परिणाम म्हणून उपसभापतींनी विरोधी पक्षांच्या आठ खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित केलं होतं. या कायद्याला देशभरातील शेतकरी संघटनांनीही आपला विरोध दर्शवला आहे. पंजाब-हरियाणा या भागातले शेतकरी या कायद्यांच्याविरोधात जास्त आक्रमक असून अनेक ठिकाणी याबाबत आंदोलनेही झाली आहेत.

अशातच आता देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसदेखील या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. काँग्रेस  पक्षाने या कायद्यांना असलेला आपला विरोध हा पहिल्यापासूनच दर्शवला आहे. आणि आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून या कायद्यांना विरोध करुन निषेध नोंदवण्यात येणार आहे. ही रॅली 4 ते 6 ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. 

हाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं

शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहेत. या कायद्यांविरोधात असलेला आपला संताप ते रस्त्यावर उतरुन करत आहेत. अशातच, या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहिर करत त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्याची भुमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. 

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात ही कृषी विधेयकं मांडण्यात आली होती. सभागृहात आवाजी मतदानाने ती मंजूरदेखील करण्यात आली. शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे ते तीन कायदे आहेत. या कायद्याला विरोधकांचा विरोध असला तरीही आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सहिने त्यांचं कायद्यात रुपांतरण झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आपल्या ट्विटरवरुन सातत्याने या कायद्याविरोधात आपली मते मांडत आहेत. तसेच अगदी अलिकडेच त्यांनी या कायद्याबाबत शेतकरी बांधवांच्या असलेल्या समस्या आणि त्यांचं म्हणणं किसान की बात नावाच्या एका चर्चासत्राद्वारे ऐकलं होतं. तसेच या कायद्याविरोधात मी तुमच्यासोबत आहे, असं आश्वासनही दिलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ragul gandhi aggressive on farm bill perform tractor rally