आवाज बंद करण्यास विरोधक उतावीळ : राहुल गांधी

पीटीआय
Thursday, 10 October 2019

- माझा आवाज बंद करण्यास विरोधक झाले उतावीळ.

सुरत : माझा आवाज बंद करण्यासाठी माझे राजकीय विरोधक उतावीळ झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते आज येथील न्यायालयात हजर झाले होते. 

"सगळ्या चोरांचे आडनाव मोदी कसे असते?' असे विधान राहुल यांनी एप्रिल महिन्यात कर्नाटकातील एका प्रचारसभेत केले होते. यावरून त्यांच्याविरोधात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीला हजर राहत राहुल यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केला. यानंतर त्यांनी ट्‌विट करत विरोधकांवर टीका केली.

"माझा आवाज बंद करण्यासाठी उतावीळ असलेल्या राजकीय विरोधकांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी सुनावणीसाठी मी आज हजर राहिलो. मला पाठिंबा देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे,' असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी पुढील सर्व सुनावणींसाठी राहुल यांना प्रत्यक्ष उपस्थितीपासून सूट द्यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. पूर्णेश मोदी यांनी या अर्जावर आक्षेप घेतल्यावर न्यायालयाने 10 डिसेंबरला यावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले. या सुनावणीसाठी राहुल यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi appears before Surat court in defamation case