Savarkar Mercy : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savarkar Mercy : महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर सावरकरांनी केला होता दयेचा अर्ज?

Savarkar Mercy : महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर सावरकरांनी केला होता दयेचा अर्ज?

Savarkar Mercy : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांमधून पुढे -पुढे सरकत आहे. या दरम्यान राहुल गांधीयांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यासह देशभरातील सावरकर प्रेमींनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी मंगळवारी सभा घेतली. यावेळी त्यांनी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासींना संबोधित केले यावेळी त्यांनी एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे तर, दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर होते असा वादग्रस्त विधान राहुल यांनी केले होते.

दरम्यान, कारागृहात बंदिवासात असताना वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून इंग्रजांकडे माफीची याचिका दाखल केली होती, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. सावरकरांविषयी अनेक प्रकारचा खोटारडा प्रचार केला जात असल्याचे तसेच सावरकरांनी इंग्रजांसमोर अनेकदा दया याचिका दाखल केल्याचे सांगितले जाते. मात्र, सावरकर अशाप्रकारे दयेचा अर्ज गांधीजींच्या सांगण्यावरून केल्याचे राजनाथ म्हणाले होते. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधींनीही आपल्यावतीने अपील करत सावरकरांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती.

काँग्रेस नेते जयराम रमेश आणि एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात गांधीजींच्या संदर्भाने २५ जानेवारी १९२० चे पत्र सोशल मीडियावर अपलोड केले. ते म्हणाले की, सावरकरांनी १९११ मध्ये पहिल्यांदा याचिका दाखल केली होती. तेव्हा गांधीजी दक्षिण अाफ्रिकेत होते. सावरकरांनी १९१३-१४ मध्ये दुसरी याचिका दाखल केली. गांधीजींचा सल्ला तर १९२० मध्ये मिळाला होता.

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून वीर सावरकरांनी दया याचिका दाखल केल्याचे सावरकरांचे वंशज रणजित सावरकर यांना वाटत नाही. रणजित सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लहान बंधू डॉ. नारायण सावरकर यांचे नातू आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा असून, महात्मा गांधींनी त्यांच्या लेखांमध्ये याचिका दाखल करण्याचं समर्थन केलं होतं.

दरम्यान, राहुल गांधींच्या सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर माफीनामा आणि दयेचा अर्ज हे शब्द ट्रेंड होऊ लागले आहे. त्यात सावरकरांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतरच इंग्रजांसमोर माफीची याचिका दाखल केली होती याचादेखील पुनुरुच्चार केला जात आहे. त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेले विधान कसे चुकीचे आणि वादग्रस्त आहे यावरून राजकारणी आणि सावरकर प्रेमींमध्ये वादाला तोंड फुटले आहे.