
Rahul Gandhi : भाजपच्या विचारांना जनताच धूळ चारेल - राहुल गांधी
न्यूयॉर्क : कर्नाटकमध्ये भाजपला उद्ध्वस्त केल्यानंतर तेलंगण आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्ष भाजपला पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. तसेच, केवळ काँग्रेसच नाही तर भारतातील जनताच द्वेषमूलक विचारसरणीचा पराभव करणार आहे, असेही राहुल म्हणाले.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी हे वॉशिंग्टन आणि सॅनफ्रान्सिस्कोनंतर न्यूयॉर्कमध्ये आले आहेत. येथे ते एक जाहीर कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी अमेरिकेतील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने आयोजित केलेल्या भोजन समारंभात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘आम्ही भाजपला उद्ध्वस्त करू शकतो, हे कर्नाटकात सिद्ध झाले आहे.
आम्ही त्यांचा पराभव नाही केला, तर त्यांना उद्ध्वस्त केले आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपकडेच सर्व साधने होती. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. माध्यमे त्यांच्या बाजूने होती, आमच्यापेक्षा दसपट अधिक पैसा त्यांच्याकडे होता, सरकार त्यांचे होते आणि तपास संस्थाही त्यांच्याच इशाऱ्यानुसार काम करत होत्या.
तरीही आम्ही त्यांना धूळ चारली. तेलंगणसह इतर राज्यांमध्येही आम्ही त्यांचा पराभव करू. या राज्यांमध्ये भाजपचे अस्तित्वच राहणार नाही. केवळ काँग्रेसच नाही, तर देशातील जनताच भाजपच्या द्वेषमूलक विचारसरणीचा पराभव करेल.’’ भाजपबरोबरील लढाई ही विचारसरणीची लढाई असल्याचेही ते म्हणाले.
‘राजकारणापेक्षाही काही गोष्टी महत्त्वाच्या’
अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल यांचा उल्लेख टाळत त्यांना कानपिचक्या दिल्या. जयशंकर हे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.
येथील एका कार्यक्रमात, ‘एक व्यक्ती’ अमेरिका दौऱ्यात सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याबाबत जयशंकर यांना विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना जयशंकर म्हणाले,‘‘परदेशात असल्यावर मी कधीही राजकारण करत नाही. मायदेशात असताना मी विविध मुद्द्यांवर हिरिरीने वाद घालण्यास सज्ज असतो.
मात्र, लोकशाही संस्कृतीचीही एक सामूहिक जबाबदारी असते. जिथे राष्ट्रहित असते, तिथे तुम्ही देशाचे प्रतिनिधी असता. काही गोष्टी राजकारणापेक्षाही महत्त्वाच्या असतात. तुम्ही देशाबाहेर ज्यावेळी पाऊल ठेवता, त्यावेळी ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणा ‘एक व्यक्ती’च्या मताशी मी असहमत असलो तरी मी भारतात परतल्यावर त्यावर उत्तर देईन.’’
राहुल गांधी म्हणाले....
कर्नाटकात भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न
महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हीच खरी समस्या असल्याचे मतदारांनी दाखवून दिले
भाजपची विचारसरणी द्वेष पसरविणारी
काँग्रेसची विचारसरणी प्रेमाचा प्रचार करणारी
सर्वांचा स्वीकार करा, सर्वांना आदराने वागवा, सर्वांवर प्रेम करा, हाच आमचा दृष्टिकोन आहे. भविष्यातील भारतात सर्व जाती-धर्माच्या, सर्व भाषकांचा समावेश असावा. भाजपमध्ये असलेल्यांशीही आमचा हाच वाद आहे. त्यांचा भारताबद्दल फारच संकुचित दृष्टिकोन आहे.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते