संकटातून नफा कमावत आहे गरीब विरोधी सरकार; राहुल गांधींचा बोचरा वार

कार्तिक पुजारी
शनिवार, 25 जुलै 2020

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना महामारी आणि भारत-चीन वादावरुन केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना महामारी आणि भारत-चीन वादावरुन केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट करत श्रमिक स्पेशल रेल्वेला झालेल्या उत्पन्नावरुन केंद्र सरकारवर गरीब विरोधी असण्याची टीका केली आहे. कोरोना विषाणूचे संकट देशावर आल्याने लोक अडचणीत आहेत, पण नफा कमावला जाऊ शकतो...आपत्तीला नफ्यामध्ये बदलून पैसा कमावत आहे गरीब विरोधी सरकार, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.

राजस्थान सत्तासंघर्ष: CM गेहलोतांनी मंत्र्यांना मध्यरात्रीपर्यंत जागवले!
राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ही टीका केली आहे. टाळेबंदीच्या काळात श्रमिक स्पेशल रेल्वे चालवण्यात आल्या होत्या. या काळात श्रमिक रेल्वेने विक्रमी नफा कमावल्याचं सांगण्यात येत आहे. यातून रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न झाले आहे. टाळेबंदीच्या काळात अनेक श्रमिक, कामगार वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते, अशावेळी त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी या रेल्वेंची सोय करण्यात आली होती. अनेक राज्यांमध्ये प्रवाशांकडून भाडे वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत होती. तर काही राज्य सरकारांनी प्रवाशांच्या तिकीटाचा भार उचलल्याचा दावा केला होता.

याआधी शुक्रवारी राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. मी सरकारला कोविड-१९ आणि अर्थव्यवस्थेबाबत सतर्क करत होतो...पण त्यांनी माझी चेतावणी ऐकली नाही. परिणामी देशावर मोठे संकट ओढावले. मी आता पुन्हा एकदा देशाला चीनबाबत सतर्क करत आहे. ते आताही माझं ऐकत नाहीत, असं गांधी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी नियमित ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

भारतातील दारिद्र्य निर्मूलन मोहिमेला धोका; जागतिक बँकेचा इशारा
गांधी यांनी २१ जूलै रोजी ट्विट करत मोदी यांना लक्ष्य केले होते. कोरोना काळातील सरकारच्या उपलब्धी..फेब्रुवारी- नमस्ते ट्रम्प, मार्च- मध्य प्रदेशातील सरकार पाडले, एप्रिल- मेणबत्ती लावण्यास सांगितलं, मे- सरकारचा ६ वा वर्धापनदिन, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जूलै- राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न. याचमुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

राहुल गांधी व्हिडिओ शेअर करुनही सरकारवर हल्लाबोल करत आहेत. प्रधानमंत्री १०० टक्के आपली प्रतिमा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातल्या सर्व संस्था या कामामध्ये त्यांना मदत करत आहेत. पण एका व्यक्तीची प्रतिमा राष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे मोदी यांनी आपली प्रतिमा संवर्धन सोडून चीन विरोधात योग्य ती पाऊलं उचलावीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi criticize bjp government tweet