
Rahul Gandhi : मोदी देवाला जग चालवायला शिकवतील; राहुल गांधी यांचा टोला
सांता क्लारा (अमेरिका) : भारतामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना वाटते की, आपल्याला स्वतःला देवापेक्षाही अधिक माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक नमुना आहेत. आपले पंतप्रधान देवाला देखील पृथ्वीवर नेमके काय चालले आहे? पटवून देऊ शकतात,अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर भाजप नेते खवळले आहेत.
राहुल यांच्या टीकेला संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेतला. राहुल हे बनावट गांधी असून ज्यांना काहीही माहिती नाही पण ते सगळ्या विषयांतील तज्ज्ञ बनले असल्याचे जोशी यांनी नमूद केले.
अमेरिकेतील ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’कडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मोहब्बत की दुकान’ या कार्यक्रमात राहुल बोलत होते. मोदींसारखे लोक स्वतःलाचा खूप काही माहिती आहे अशा प्रकारचा आव आणतात.
ते इतिहासकाराला इतिहास, वैज्ञानिकाला विज्ञान आणि लष्करालाही युद्धतंत्र समजावून सांगू शकतील. प्रत्यक्षात प्रत्येकाला सगळ्या गोष्टी जाणू घेण्यासाठी हे जग खूप मोठे असून ते तितकेच जटिल स्वरूपाचे आहे. भारतामध्ये काही लोकांचा असा समूह आहे की ज्याला ठामपणे वाटते की आपल्यालाच सगळे माहिती आहे. हाच खरा रोग आहे.
आपल्याला देवापेक्षाही अधिक माहिती आहे असे त्यांना वाटते, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाच्या शेजारी बसविले तर ते देवाला देखील सांगू लागतील की हे जग कसे चालते आहे. तेव्हा देवाला देखील आश्चर्य वाटेल की मी हे नेमके काय तयार केले आहे?
असे राहुल यांनी स्पष्ट केले. राहुल यांच्या कार्यक्रमाला सिलिकॉन व्हॅलीप्रमाणेच लॉस एंजलिस आणि कॅनडामधील अनिवासी भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे नेते मोहिंदरसिंग गिलझियान यांनी दिली.
आयडिया ऑफ इंडियावर हल्ला
सध्या ‘आयडिया ऑफ इंडिया’वरच हल्ले होत असून त्याला आव्हान दिले जात आहे असे सांगताना राहुल यांनी राजदंडावरून निर्माण झालेल्या वादावर देखील भाष्य केले. देशातील मोदी सरकार हे बेरोजगारी,
भाववाढ यासारख्या समस्यांवर तोडगा काढू शकत नाही त्यामुळे ते द्वेष पसरवत आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीयांचे देखील कौतुक केले. आम्हाला तुमच्या सगळ्यांचा मोठा अभिमान आहे, तुम्ही सगळे येथे भारताचे राजदूत आहात. आज तुम्ही येथे जे काम करत आहात त्यामुळेच तुमचे अमेरिकेकडून कौतुक होते, त्याचा आम्हाला देखील अभिमान वाटतो, असे राहुल यांनी नमूद केले.
राहुल गांधी म्हणाले
- सगळ्या गोष्टी भाजपने ताब्यात घेतल्याने आम्ही यात्रा काढली
- यात्रेमध्ये केवळ मी एकटाच चाललो नाही अवघा देश चालला
- यात्रेदरम्यान पाय दुखत असताना देखील मी चालत राहिलो
- यात्रेचा २५ किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर थकवा संपला
- यात्रेमुळेच द्वेषाच्या बाजारामध्ये प्रेमाचे दुकान उघडण्याचा निर्णय
- काँग्रेस सर्वांवर प्रेम करते, सर्वांचे म्हणणे ऐकून घेतो, रागावत नाही
- आम्हाला सगळे काही ठावूक आहे अशी वाटणारी मंडळी सत्ताधीश
विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव
विरोधकांची योग्य पद्धतीने युती झाली तर भाजपला सहज पराभूत केले जाऊ शकते. काँग्रेस पक्ष त्याचदृष्टीने प्रयत्न करत असून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे . कर्नाटकच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाचा मोठा विजय झाल्याकडे राहुल यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ते ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
घोषणा देणाऱ्याचेही स्वागत
राहुल यांच्या कार्यक्रमामध्ये काही खलिस्तान समर्थकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. राहुल यांचे भाषण सुरू असताना त्यांनी घोषणाबाजी केल्याने कार्यक्रमादरम्यान काहीकाळ गोंधळ झाला होता. शीख विरोधी दंगलींचा संदर्भ घेऊन अनेकांनी यावेळी गांधी कुटुंबीयांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या घोषणा ऐकल्यानंतर राहुल यांनी घोषणा देणाऱ्यांचे हसून स्वागत केले.