असंघटित क्षेत्र संपवण्याचा मोदी सरकारचा डाव; राहुल गांधींचा गंभीर आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

राहुल गांधी यांनी असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रावर योजनाबद्ध रीतीने मोदी सरकारतर्फे होणाऱ्या आक्रमणाचा आरोप करताना नोटबंदी, ‘जीएसटी’ची सदोष अंमलबजावणी आणि लॉकडाउन यांचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे.

नवी दिल्ली- ‘‘मोदी सरकारने ९० टक्के रोजगारनिर्मिती करणाऱ्या असंघटित क्षेत्राचा नायनाट करण्याचा विडा उचलला आहे आणि त्यांच्या या कारस्थानाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे,’’ असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी ट्‌वीटरद्वारे केले. ‘अर्थव्यवस्था की बात’ या शीर्षकाने ते आर्थिक मुद्यांवर जनतेशी संवाद साधणार आहेत व त्यातील हे पहिले ट्विट आहे. 

‘मन की बात’ला लोकांची मिळेना साथ; गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ

राहुल गांधी यांनी असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रावर योजनाबद्ध रीतीने मोदी सरकारतर्फे होणाऱ्या आक्रमणाचा आरोप करताना नोटबंदी, ‘जीएसटी’ची सदोष अंमलबजावणी आणि लॉकडाउन यांचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. या तीन निर्णयांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचेही म्हटले आहे. २००८ मध्ये जगभरात मंदीची लाट आली होती, परंतु भारतावर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता याचा हवाला देत राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की याचे कारण तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना विचारले असता त्यांनी ज्या देशाचे असंघटित क्षेत्र मजबूत आहे त्या अर्थव्यवस्थेवर कोणतीही आर्थिक उलथापालथ परिणाम करू शकणार नाही, असे सांगितले होते. परंतु हे क्षेत्रच नष्ट करण्याचा डाव खेळला जात आहे. 

प्रशांत भूषण १ रुपयाचा दंड भरणार? ट्विट करुन दिलाय संकेत

सामान्यांचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न 

असंघटित क्षेत्रातच खऱ्या अर्थाने पैसा खेळता असतो. या क्षेत्रातच लाखो-कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होतात. परंतु त्या विखुरलेल्या स्वरूपात असतात. संघटित क्षेत्रात मूठभरांतर्फेच उलाढाली होत असल्याने ते लक्षात येतात. आता असंघटित क्षेत्रातील या अमाप पैशावर मोदी सरकारची नजर गेलेली आहे आणि तो पैसा या सामान्य लोकांकडून कसा हडप करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत असा आरोप करून राहुल गांधी यांनी षड्‌यंत्राविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे आवाहन सामान्य लोकांना व असंघटित क्षेत्राला केले. 

लॉकडाउनची योजनाबद्ध चाल 

नोटबंदी, सदोष जीएसटी आणि लॉकडाउनमुळे या क्षेत्राची पुरती वासलात लागली व परिणामी बेकारी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते. लॉकडाउनचा निर्णय अचानक नव्हता तर असंघटित क्षेत्र संपविण्यासाठीची ती योजनाबद्ध चाल होती, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांना ट्विटमध्ये केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi criticize narendra modi and bjp on economy