पंतप्रधान मोदी स्वतःच्या प्रेमात; राहुल गांधींचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्रतिमेच्या प्रेमापोटी चीनच्या दबावाखाली झुकले असल्याचा नवा हल्ला राहुल गांधींनी चढवला आहे.

नवी दिल्ली, ता. २० : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्रतिमेच्या प्रेमापोटी चीनच्या दबावाखाली झुकले असल्याचा नवा हल्ला राहुल गांधींनी चढवला आहे. भारताचे पंतप्रधान या नात्याने मोदी आपल्या प्रतिमेची चिंता न करता चीनी आव्हानाचा मुकाबला करतील की नांगी टाकतील, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. 
 

वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडण्यासाठी ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ संदेशांची मालिका राहुल गांधींनी सुरू केली आहे. त्या अंतर्गत चीनी आक्रमणामागच्या कारणांची मांडणी करणारा हा सलग दुसरा व्हिडीओ संदेश आहे. याआधीच्या व्हिडीओमध्येही चीनी घुसरखोरीवरून त्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर प्रहार केले होते. ताज्या व्हिडीओ संदेशातही राहुल गांधींनी ‘पंतप्रधान मोदींनी सत्ता मिळविण्यासाठी कणखर नेतृत्वाची नकली प्रतिमा तयार केली. हेच त्यांचे सर्वात मोठे बलस्थान होते. आता ही प्रतिमा भारताचा सर्वात मोठा कच्चा दुवा ठरली आहे’, अशी टीका केली आहे. मोदींवर चढवताना मोदींच्या ‘कणखर राजकारणी’ या प्रतिमेतील कच्चे दुवे जाणून घेऊन चीनने हा सापळा रचल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी दबावापुढे झुकले असल्याचे आरोपवजा निरीक्षणही राहुल गांधींनी मांडले आहे. 

आम्ही तुमच्याकडून 9 कोटी डोस घेऊ; लस निर्मिती आधीच या देशाने केला करार
चीनने भारतीय हद्दीत शिरकाव केला आहे आणि पंतप्रधान उघडउघड म्हणतात की घुसखोरी झालेली नाही. यामुळे स्पष्ट जाणवते, की त्यांना आपल्या प्रतिमेची चिंता आहे आणि प्रतिमा वाचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे. या प्रतिमाप्रेमापोटी पंतप्रधान मोदींना सहज सापळ्यात अडकवता येऊ शकते ही जाणीव चीनला होत असेल, तर पंतप्रधान मोदी देशाच्या काहीही कामाचे उरणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

कणखर नेता अशी प्रतिमा टिकवून ठेवणे हे मोदींसाठी अपरिहार्य आहे आणि चीन याच गोष्टीचा फायदा गेऊन पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर हल्ला करत आहे. आता मोदी चीनच्या खेळीला उत्तर देतात की आपल्या प्रतिमेच्या चिंतेपायी चीनसमोर नमते घेतात हे पाहायचे आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi criticize pm narendra modi over chin