मोदीजी, जो उपदेश करता, त्याप्रमाणे वागा : राहुल गांधी

पीटीआय
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मोदीजी, नुदीदंते नडे'. केवळ भाषण करण्यासाठी तुम्हाला देशाने पंतप्रधान बनविले नाही. भारतातील गरिबांचे कोट्यवधी रुपये लुबाडून हिरे व्यापारी नीरव मोदी हा विदेशात पळून गेला, पण चौकीदाराने एक शब्दही काढला नाही

रामदुर्ग (कर्नाटक) - ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धनाढ्यांवर मेहेरनजर असल्याची टीका करीत भ्रष्टाचारविरोधात "लोकपाल'ची नियुक्ती त्यांनी अजून का केली नाही,' असा सवाल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केला. कर्नाटकातील बाराव्या शतकातील सुधारक बसवेश्‍वर यांचे "नुदीदंते नडे' (तुम्ही, जो उपदेश करता, त्या प्रमाणे वागा) हे वचन त्यांनी मोदींना उद्देशून उद्‌धृत केले.

उत्तर कर्नाटकमधील निवडणूक प्रचार दौऱ्यात रामदुर्ग येथील सभेत राहुल गांधी बोलत होते. पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराबत मोदी गप्प असल्याबद्दल, "" गुजरातमध्ये मोदीजींनी "लोकायुक्त'ची अंमलबजावणी केली नाही. पंतप्रधानपदाची मोदी यांची चार वर्षे झाली आहेत, तरी त्यांनी दिल्लीतही "लोकपाल' नियुक्त केलेला नाही,'' अशी खोचक टीका त्यांनी केली. आपण देशाचे चौकीदार असल्याचे मोदी सांगतात. पण, ते गैरव्यवहारांवर व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीतील वाढत्या उलाढालींवर मात्र ते बोलत नाहीत. देशाचा चौकीदार कर्नाटकात येऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर (माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा) भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करतात. हे मुख्यमंत्री तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत आणि भाजपच्या काळात चार मंत्रीही तुरुंगात होते,'' असे ते म्हणाले.

बसवेश्‍वर यांचे वचन उद्‌धृत करून राहुल म्हणाले, ""मोदीजी, नुदीदंते नडे'. केवळ भाषण करण्यासाठी तुम्हाला देशाने पंतप्रधान बनविले नाही. भारतातील गरिबांचे कोट्यवधी रुपये लुबाडून हिरे व्यापारी नीरव मोदी हा विदेशात पळून गेला, पण चौकीदाराने एक शब्दही काढला नाही.''

Web Title: Rahul Gandhi criticizes Narendra Modi