
New Parliament Building : '..ते उद्घाटनाला राज्याभिषेक समजू लागले', राहुल गांधींचा नेमक्या जागेवर घाव
New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस आहे. ते म्हणाले की ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे.
या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं, असं विरोधी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. परंतु केंद्र सरकारने कुणाचंही न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला.
या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर नेमक्या शब्दांत टीका केली आहे. 'संसद लोकांचा आवाज आहे! पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. आज संपन्न झालेला उद्घाटन सोहळा पाहिला तर धार्मिक मंत्रोच्चार आणि हिंदू परंपरेनुसार विधिवत पूजन करण्यात आलं. लोकसभेत 'सेंगोल' स्थापित करुन त्याला सामर्थ्याचा राजदंड म्हणून स्वीकारण्यात आलं. याच अनुषंगाने राहुल गांधी टांनी टीका करत हे केवळ संसदेचं उद्घाटन होतं, पंतप्रधानांनी त्याला राज्याभिषेक समजलं आहे, अशी टीका केली आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे
नवी संसद आत्मनिर्भर भारताची साक्ष देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यातून भारताच्या निर्धाराचा संदेश जगाला मिळतो.
संसद आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवे संसद भवन नियोजनाला वास्तवाशी, धोरणाला बांधकामाशी, इच्छाशक्तीशी कृतीशक्तीशी, संकल्पाला यशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.
ही नवीन इमारत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माध्यम बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे.
या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नव्या-जुन्याच्या सहजीवनासाठीही ही नवी इमारत आदर्श ठरणार आहे.
ते म्हणाले की, जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासातून जगाच्या विकासाची हाक देईल.
नव्या वाटांवर चालल्यानेच नवे आदर्श निर्माण होतात, असे ते म्हणाले. आज नवा भारत नवीन मार्ग तयार करत आहे आणि नवीन ध्येये निश्चित करत आहे.