काँग्रेसची नाराजी ठरले पेल्यातील वादळ; मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींशी चर्चा 

काँग्रेसची नाराजी ठरले पेल्यातील वादळ; मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींशी चर्चा 

नवी दिल्ली - ‘‘ महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेस निर्णायक भूमिकेत नाही,’’ या जाहीर नाराजीनंतर खुद्द राहुल गांधींनीच आपल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास झाल्याचा केलेला दावा पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींशी साधलेल्या संपर्कामुळे काँग्रेसची नाराजी पेल्यातले वादळ ठरले आहे. मात्र, कॉंग्रेसमधील एका गटाने या नाराजीचा संबंध राज्यातील कोरोना संकटाशी आणि राज्य सरकारच्या अपयशाशी जोडला आहे. 

दरम्यान कोरोना संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सोबत असल्याची ग्वाही खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. राहुल यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाले होते, अखेरीस हा गोंधळ वाढत असल्याचे दिसताच त्यांनी याचे खापर माध्यमांवर फोडले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींशी आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहुल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच राजकीय समन्वय दर्शविण्यासाठी सरकारमधील घटक पक्षांची बैठकही त्यांनी बोलावली होती. काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, राज्यात ‘ ठाकरे सरकार’ असून अर्थ, गृह तसेच आरोग्य ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. कोरोनावरील उपाययोजनांमध्ये कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा काहीही सहभाग नाही. कोरोनामुळे गंभीर झालेली परिस्थिती पाहता या संकटात राज्य सरकारच्या अपयशामध्ये भागीदार बनण्याची काँग्रेसची इच्छा नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

...म्हणून नाराजी 
सरकारमध्ये कॉंग्रेसची कोंडी झाल्याचा दावा करताना सूत्रांनी सांगितले, की राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसला डावलले गेले. राज्यसभेच्या जागेचा फायदा राष्ट्रवादीला झाला. तर विधान परिषदेच्या निवडणुकीतही 15 अतिरिक्त मते हाताशी असूनही केवळ उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे काँग्रेसला दुसरा उमेदवार मागे घ्यावा लागला. मुंबईत महापौर बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना साधे बोलावण्यातही आले नव्हते. दरम्यान, राज्यात काँग्रेसला डावलण्यामागे पडद्यामागून भाजपशी संबंध सुधारण्याचा शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा प्रकार असल्याचीही शंकाही काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे. मात्र पक्षाच्या अन्य एका नेत्याच्या म्हणण्यानुसार राजकीय नाराजीची किंमत वसूल करण्याची वेळ काँग्रेसने कधीच गमावली आहे. 

काँग्रेसमध्ये खदखद 
राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम यासारखी खाती काँग्रेसकडे आहेत. दोन आठवड्यांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर किमान समान कार्यक्रम तयार करून आणि मंत्रिपदांसाठी घासाघीस करून सरकार स्थापन झाले. मात्र आता सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com