राहुल यांचा ‘काश्‍मीर राग’ निषेधार्ह

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 October 2019

भाजपकडे कोलीत
जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम ३७० रद्द करण्याचा कायदा सरकारने केल्यावर राहुल गांधी यांनी विरोधी नेत्यांना घेऊन श्रीनगर गाठले व तेथून माघारी पाठवल्यावर जे ट्‌विट केले त्याचे पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्रांत भांडवल केले. नंतर राहुल गांधी यांना स्वतःचेच शब्द गिळावे लागले. तो प्रकार ताजा असतानाच ब्रिटनमध्ये गेलेल्या राहुल यांनी कोर्बिन यांची भेट घेऊन काश्‍मीरबाबत भलत्याच गप्पा केल्याची चर्चा सुरू झाल्याने भाजपच्या हाती पुन्हा कोलीत मिळाले आहे.

नवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी भारताविरुद्ध गरळ ओकून पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या ब्रिटनमधील मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अनाहूत गप्पाष्टकांवर भाजपने कडाडून टीका केली आहे. या चर्चेनंतर स्वतः कोर्बिन यांनीच माहिती देताना, गांधींबरोबर काश्‍मीरमधील हिंसा व भीतीच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली, असा गौप्यस्फोट केला. यावरून भाजपने महाराष्ट्रासह देशभरात रान उठवणे सुरू केले आहे.  

या चर्चेवेळी राहुल यांचे निकटवर्ती मानले जाणारे धालीवाल, गुरमिंदर रंधावा आदी हजर होते. भारताच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची ब्रिटिश प्रतिनिधींबरोबर झालेली बैठक चांगली झाली. आम्ही काश्‍मिरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या स्थितीवर चर्चा केली. या क्षेत्रातील तणाव तातडीने कमी होण्याची गरज आहे, तसेच दीर्घकाळापासून असलेले भीती व हिंसेचे वातावरणही संपुष्टात यायला हवे, असे कोर्बिन यांनी म्हटले होते. 

कोर्बिन यांच्या ट्‌विटनंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपच्या सागरपार सेलचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी सांगितले, की कोर्बिन यांनी काँग्रेस नेत्यांबरोबर काश्‍मीरबाबत चर्चा झाली असे स्वतःच स्पष्ट केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. आता काँग्रेस कोलांटउडी मारू शकत नाही. राहुल यांच्याबरोबर असे चेहरे या वेळी होते जे त्यांच्याबरोबर अनेक काँग्रेस नेत्यांच्याही जवळचे मानले जातात. हे लोक तेथे जाऊन चर्चा कोणाशी करत होते, तर काश्‍मीरप्रश्‍नी भारतविरोधी व पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या मजूर पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबरोबर. हे अत्यंत निषेधार्ह आहे. ही एकूणच भेट देशाच्या दृष्टीने उचित नाही. काँग्रेसने यावर खुलासा तातडीने केला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul gandhi kashmir Bjp politics