राहुल गांधी जानेवारीत पुन्हा पक्षाध्यक्ष?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

सोनिया गांधी यांनीही असंतुष्टांशी संपर्क साधून त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांचे विश्‍वासू अहमद पटेल यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवरुन तपशीलवार बोलणी केली.

नवी दिल्ली - काँग्रेस कार्यकारिणीच्या वादळी बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षात समेटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून खजिनदार व सोनिया गांधी यांचे विश्‍वासू अहमद पटेल यांनी आज असंतुष्ट नेते गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवर तपशीलवार चर्चा केली. पक्षातील एकंदर वातावरण लक्षात घेता राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदी फेरनियुक्तीच्या प्रक्रियेला या प्रसंगाने गती मिळाल्याचे सांगितले जात असून, बहुधा जानेवारी महिन्यापर्यंत ती पूर्ण होईल असे संकेत पक्षातून मिळत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्र फुटले कसे?
सोनिया गांधी यांनीही असंतुष्टांशी संपर्क साधून त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांचे विश्‍वासू अहमद पटेल यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवरुन तपशीलवार बोलणी केली. या चर्चेत पत्र फुटले कसे या प्रश्‍नाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. परंतु असंतुष्टांच्या गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार हे पत्र राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांकडून फोडण्यात आल्याचे समजते. असंतुष्ट नेते हे भाजपशी संगनमत करीत असल्याची जी बातमी काल उठविण्यात आली होती त्यामागेही राहुल गांधी यांच्या टीममधील काही मंडळींचा हात असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तो विषय देशाच्या दृष्टीने महत्वाचाः सिब्बल
नवी दिल्लीः संपूर्ण संघटनात्मक बदलांचा आग्रह धरत पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा त्यांची ‘मन की बात’ मांडली. हा विषय केवळ एका पोस्टपुरता मर्यादित नसून तो देशाच्या दृष्टिकोनातून देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तत्पूर्वी काँग्रेसच्या २३ बड्या नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनात्मक फेरबदलांची मागणी केली होती. या पत्रामुळे काँग्रेसमध्येही दोन गट असल्याचे उघड झाले होते. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीमध्येही याच मुद्यावरून दोन गटांमध्ये बरीच वादळी चर्चा झाली होती, अखेरीस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi re-elected party president in January