Bharat Jodo Yatra : ‘गेहलोत, पायलट दोघेही बहुमूल्य’ ; राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : ‘गेहलोत, पायलट दोघेही बहुमूल्य’ ; राहुल गांधी

इंदूर : ‘‘अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही पक्षासाठी बहुमूल्य आहेत. राजस्थानातील राजकीय स्थितीचा भारत जोडो यात्रेवर काही परिणाम होणार नाही.’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले.

येथे पत्रकार परिषदेत राहुल यांना, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात शाब्दीक चकमकीबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, ‘‘याविषयावर पक्षश्रेष्ठी निर्णय करतील. हे दोघेही आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. भारत जोडो यात्रा जेव्हा राजस्थानात जाईल, तेव्हा तिचे भव्य स्वागत होईल याची मला खात्री आहे.’’

प्रतिमा बिघडविण्याचे प्रयत्न

माझी प्रतिमा बिघडविण्यासाठी भाजप हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. ‘‘त्यामुळे माझे नुकसान होईल, असे लोकांना वाटते. परंतु, याचा फायदाच होत आहे.माझी प्रतिमा बिघडविण्यासाठी भाजप जेवढा पैसा ओतेल, तेवढी अधिक ताकद मला मिळेल’’ असे राहुल यांनी म्हटले आहे.

चालू की नाही याची भीती होती

आतापर्यंतच्या भारत जोडो यात्रेतील कोणता क्षण खास होता, असा प्रश्न विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘‘यात्रेचे नियोजन एक वर्षांपूर्वी केले होते. यात्रेच्या काळात गुडघ्याचे जुने दुखणे पुन्हा उफाळून आले. त्यामुळे चालू शकेन की नाही असे वाटत होते. परंतु, त्यावर आता मी विजय मिळविला आहे. यात्रेदरम्यान एक मुलगी मला भेटली होती. ती म्हणाली की मला तुमच्या सोबत संपूर्ण यात्रा चालायची आहे. परंतु, वडिलांनी परवानगी दिलेली नाही. तरीही मी तुमच्यासोबत आहे, अशा प्रकारच्या क्षणांतून माझी ताकद वाढली आहे. भीतीवर विजय मिळविल्याने दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करता आले आहे.’’