esakal | बहुमत चाचणी घ्या! तरच अधिवेशन; राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

ashok-gehlot-kalraj-mishra

राजस्थान उच्च न्यायालयाने नव्याने आदेश काढल्याने आम्ही इतर कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यातर्फे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले...

बहुमत चाचणी घ्या! तरच अधिवेशन; राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
पीटीआय

जयपूर/ नवी दिल्ली - विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन हवे असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले तरच, तातडीच्या नोटीशीवरून विधानसभेचे अधिवेशन बोलविता येईल, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आज स्पष्ट केले. अधिवेशन बोलविण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव दुसऱ्यांदा परत पाठविताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. 

विधानसभेचे अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल मिश्र यांना पाठविलेला प्रस्ताव मिश्रा यांनी आज परत पाठवला आणि तीन विविध मुद्यांवर स्पष्टीकरण देऊन नवा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली. राज्य सरकार २१ दिवसांची नोटीस देण्यास तयार असेल तर अधिवेशन बोलविता येईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे. मात्र, बहुमत चाचणी हाच अधिवेशनाचा अजेंडा असल्याचे सरकारने जाहीर केल्यास हे अधिवेशन लवकरात लवकरही बोलविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने अधिवेशनाबाबतचा पाठविलेल्या प्रस्तावात बहुमत चाचणीचा उल्लेख नव्हता. याशिवाय, बहुमत चाचणी झाल्यास त्याचे थेट प्रक्षेपण केले जावे आणि कोरोना संसर्गामुळे पूर्ण काळजी घेऊन बैठक व्यवस्था असावी, असे एकूण तीन मुद्दे राज्यपालांनी सांगितले असून त्यावर स्पष्टीकरण देऊन नवीन प्रस्ताव पाठवावा, असे म्हटले आहे. राज्यपालांकडून काही शंकांसह प्रस्ताव परत आला असून त्यावर चर्चा सुरु आहे, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

विधानसभा अध्यक्षांची याचिका मागे 
बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेण्यास राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाने परवानगी दिली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने नव्याने आदेश काढल्याने आम्ही इतर कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यातर्फे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले. राजस्थानमधील सत्तासंघर्ष सध्या न्यायालयात सुरु आहे. सचिन पायलट आणि इतर १८ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिशीला उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. त्यामुळे जोशी यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. या प्रकरणी आदेश देण्यापासून उच्च न्यायालयाला रोखण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. 

देशभरात काँग्रेसची आंदोलने 
राजस्थानातील राज्यपालांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने आज अनेक राज्यांमध्ये राजभवनावर मोर्चे काढले. गुजरातमध्ये राजभवनावर मोर्चा काढत असलेल्या काँग्रेसच्या ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये गुजरात काँग्रेसच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. राजधानी दिल्लीतही काँग्रेसने आंदोलन केले. याशिवाय, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांतही आंदोलन झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील विद्यमान स्थितीबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी आठवडाभरापूर्वी पाठविलेल्या पत्राची देखील आपण मोदींना आठवण करून दिली.
-अशोक गेहलोत, मुख्यमंत्री राजस्थान