Rajasthan Loksabha Election Result : राजस्थान : दहा वर्षांनंतर काँग्रेसचे खाते उघडले

भाजपला ‘चारशे पार’ चे ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाचे असणारे राज्य राजस्थानमध्ये काँग्रेसने दहा वर्षानंतर खाते उघडून भाजप नेत्यांच्या मनसुब्यांना धक्का दिला आहे.
Rajasthan Loksabha Election Result
Rajasthan Loksabha Election Resultsakal

भाजपला ‘चारशे पार’ चे ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाचे असणारे राज्य राजस्थानमध्ये काँग्रेसने दहा वर्षानंतर खाते उघडून भाजप नेत्यांच्या मनसुब्यांना धक्का दिला आहे. भाजपने २५ पैकी २५ जागांवर उमेदवार उभे केले तर काँग्रेसने २२ जागा तर तीन जागा िसकर, नागौर आणि बान्सवाडा येथे ‘इंडिया’ आघाडीला जागावाटपानुसार घटक पक्षाला जागा दिल्या.

२०१४ आणि २०१९ रोजी क्लिन स्विप करणाऱ्या भाजपला आपल्या जागा राखण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. २५ पैकी चौदा जागांवर कमळ फुलत असले तरी भाजपला बरेच नुकसान सहन करावे लागले. परिणामी भाजपला चारशे पारचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये भाजपची कामगिरी निराशाजनक राहिली. भाजपला सर्वाधिक फटका जाटबहुल मतदारसंघात बसला.

या ठिकाणच्या सिकर, चुरू आणि झुंझुनूत काँग्रेसने मुसंडी घेतली. अर्थात काँग्रेसने दहापेक्षा अधिक जागा जिंकू असा दावा केला आहे. राजस्थानमध्ये भाजपने एकीकडे अनेक विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना संधी दिली तर काही जागांवर नवीन चेहरे उतरविले होते.

कॉंग्रेस पक्षाने देखील अनेक ठिकाणी सक्षम आणि जातीचे समीकरणे ओळखून उमेदवार उतरले आणि त्यामुळे भाजपसमेार अडचणी वाढल्या. भाजपचे राजस्थानातील प्रचारतंत्र प्रभावीपणे राबविण्यात आलेले असताना जनतेने मात्र

कॉंग्रेसला भरभरून मते दिली. गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेस राजस्थानमध्ये खाते उघडण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळी त्यांना यश आले.

पाच महिन्यांपूर्वीच राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आलेली असताना लोकसभा निवडणूक ही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसचा सुपडासाफ करणाऱ्या भाजपला यंदा काँग्रेसने जोरदार टक्कर दिली. विधानसभा निकालानंतर ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदी न बसवता पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. तेथेच नाराजीची बिजे राेवली गेली.

वसुंधरा राजे या भाजपपासून अंतर राखून राहत होत्या. अशावेळी भाजपला बसलेल्या फटक्यामागे वसुंधरा राजे फॅक्टर असल्याचे काही तज्ञ सांगत आहेत. नाराजीचा फटका निकालात जाणवत असताना राजस्थानात भाजपच्या बाजूने पहिला निकाल लागला. जयपूर मतदारसंघात मंजू शर्मा यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास यांना पराभवाचा सामना करावा लागला.

राजस्थानच्या २५ लोकसभा मतदारसंघात २६६ उमेदवार उभे होते आणि त्यापैकी १९ महिला रिंगणात होत्या. पहिल्या टप्प्यांतील १२ लोकसभा मतदारसंघात ५८.२८ टक्के तर दुसऱ्या टप्प्यांत १३ लोकसभा मतदारसंघासाठी ६५.५२ टक्के मतदान झाले. राजस्थानातील मतदानाची सरासरी ६२.१० टक्के राहिली आणि ती २०१९ च्या तुलनेत ४.२४ टक्के कमी राहिली.

या निवडणुकीत लोकसभेचे अध्यक्ष, चार केंद्रीय मंत्री, सात आमदारांसह राज्याचे दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या दोन मुलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविलेली असताना काँग्रेस मात्र आघाडीसह मैदानात उतरली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने राज्यातील ४९.४७ टक्के जनतेने कौल दिला असून काँग्रेसच्या पारड्यात ३७.७८ टक्के मतांचे दान पडले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत ‘एनडीए’ला राजस्थानात दणदणीत विजय मिळाला होता. २५ पैकी २४ जागा जिंकताना भाजपला ५९.०७ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नसताना ३४.५९ टक्के मते पडली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला सुमारे दहा जागांचे नुकसान सोसावे लागत आहे.

नागौरची जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनिवाल यांनी राखली असून त्यांनी भाजपच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांच्यापेक्षा ५० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. बसपचे गजेंद्र सिंह राठोड हे चौथ्या क्रमाकांवर राहिले. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.

राज्यातील दिग्गज नेते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (कोटा), भागिरथ चौधरी (अजमेर), भुपेंदर यादव (अलवर), गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूर) राव राजेंद्र सिंह (जयपूर ग्रामीण) यांची विजयाकडे घोडदौड राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com