'जाईन तर रेल्वेनेच', एका मुलीच्या हट्टासाठी 'राजधानी' धावली 535 किमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

एका प्रवाशासाठी राजधानी एक्सप्रेस 535 किमी धावली. या संपूर्ण प्रवासात रेल्वेमध्ये अनन्या एकटीच प्रवासी होती. 

रांची - एखाद्या प्रवाशासाठी 535 किमी रेल्वे धावल्याचं कधी वाचलं किंवा ऐकलं आहे का? पण हे घडलंय असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. बरं रेल्वे नाही तर राजधानी एक्सप्रेसनं एका मुलीसाठी 535 किमी प्रवास केला. मुलगी प्रवासासाठी अडून बसल्यानं अखेर रेल्वे प्रशासनाने नमतं घेत तिला रांचीला पोहोचवलं. मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी राजधानी एक्सप्रेस त्या मुलीसाठी रांचीला पोहोचली. 

राजधानी एक्सप्रेसने जाण्यासाठी अडून बसलेल्या अनन्याला बराचवेळ तिला बसने जाण्यासाठी विनंती केली जात होती. तिने मात्र जाईन तर राजधानीनेच असा हट्ट धरला. बसने जायचं असतं तर रेल्वेचं तिकिट का काढलं असतं असा प्रश्नही तिने केला. शेवटी तिच्या भूमिकेपुढे रेल्वे प्रशासनाचे काही चालले नाही. 

हे वाचा - पक्षपातीपणाच्या आरोपावर फेसबुक म्हणाले, आम्ही निष्पक्ष

झारखंडमधील डालटनगंज इथं टाना भगत या आदीवासी जमातीने आंदोलन केलं होतं. यामुळे राजधानी एक्सप्रेस डालटनगंज इथंच थांबवावी लागली. तेव्हा राजधानीतून 930 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातीत 929 प्रवाशांना डालटनगंज इथून बसने पाठवण्यात आले. पण अनन्या नावाच्या मुलीने बसने प्रवास करण्यास नकार दिला. शेवटी सांयकाळी चारच्या सुमारास राजधानी एक्स्प्रेस डालटनगंजहून गयाला नेण्यात आली. तिथून गोमो आणि बोकारो स्टेशनमार्गे रांचीला गेली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेल्वेच्या आतापर्यंतच्या इतिहासात अशी घटना घडलेली नसल्याचं म्हटलं जात आहे. एका प्रवाशासाठी राजधानी एक्सप्रेस 535 किमी धावली. या संपूर्ण प्रवासात रेल्वेमध्ये अनन्या एकटीच प्रवासी होती. राजधानी एक्सप्रेस मध्यरात्री 1.45 वाजता रांची रेल्वे स्टेशनवर पोहोचली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajdhani express raveling 535 km for girl to ranchi