खर्गे, देवेगौडा राज्यसभेच्या रिंगणात?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

भाजपकडे संख्याबळ नाही
भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तरी त्याला निवडून आणण्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांची काही मते वाया जाऊ शकतात. काँग्रेस-जेडीएसने युती करून दोन उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविल्यास व भाजपचे अतिरिक्त आमदार तटस्थ राहिल्यास युतीचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यासाठी राज्याच्या हिताच्या दृष्टीने खर्गे व देवेगौडा यांना राज्यसभेवर निवडून आणण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बंगळूर - येत्या जून महिन्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेसची उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजते. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या लोकसभा निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे, एच. डी. देवेगौडा, वीरप्पा मोईली, मुनियप्पा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. परिणामी देशाच्या संसदेत कर्नाटकाचा आवाज कमी पडला आहे. अनेक बाबतीत राज्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. कर्नाटकाची प्रभावीपणे बाजू मांडणारे संसदेत कोणीच नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राज्यातील काँग्रेस- जेडीएस युती सरकारचे पतन होऊन भाजप सरकार सत्तेवर आले तरी केंद्रीय अनुदानासह विविध विषयांत राज्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. यासाठी खर्गे व देवेगौडा यांची राज्यसभेवर निवड करण्याची मागणी होत आहे.

राज्यसभा सदस्य असलेले काँग्रेसचे राजीव गौड, बी. के. हरिप्रसाद, भाजपचे प्रभाकर कोरे, जेडीएसचे कुपेंद्र रेड्डी येत्या २५ जूनला निवृत्त होत आहेत. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला एक व भाजपला दोन जागा मिळू शकतात. ‘जेडीएस’कडे उमेदवार विजयी होण्यासारखे संख्याबळ नाही. परंतु काँग्रेस व भाजपच्या पाठिंब्यावर ते आपला उमेदवार निवडून आणू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajyasabha election for four seats in karnataka