राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती बिघडली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

आयोध्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत न्यृत्य गोपाल दास यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 

लखनऊ - आयोध्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत न्यृत्य गोपाल दास यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अॅम्ब्युलन्समधून लखनऊला नेलं जात आहे. महंत नृत्य गोपालदास यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची माहिती समजते. तसंच छातीतही दुखत असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातून ते बरेही झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपालदास यांना गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात दाखल केलं होतं. 

महंत नृत्य गोपाल दास हे छोटी छावनीतील असून त्यांचे शिष्य देश विदेशात पसरले आहेत. ते केवळ राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नाहीत तर कृष्ण जन्म भूमी न्यासाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मथुरेत कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ते सहभागी होतात. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या ट्रस्टवरून साधू संतांमध्ये वाद होता. जेव्हा ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास यांची नियुक्ती झाली तेव्हा हा वाद शांत झाला.

हे वाचा - केंद्र सरकारमुळेच काश्मीरी तरुणांनी हाती शस्त्रे घेतली; मेहबुबा मुफ्तींची केंद्र सरकारवर टीका

नृत्य गोपाल दास यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच संन्यास घेतला आणि ते आयोध्येत आले होते. त्यानंतर काशीला संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी गेले. काशीवरून 1953 मध्ये पुन्हा आयोध्येत आल्यानंतर मणिराम दास छावणीमध्ये ते थांबले. त्यांनी राम मनोहर दास यांच्याकडून दीक्षाही घेतली. बाबरी विध्वंस प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram janma bhumi trust chairman mahant nrutya gopal das hospitalized