गोवा : मांद्र्यात खलप यांच्या उमेदवारीला वाढता विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मार्च 2019

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित देशमुख यांनी काल सकाळी खलप यांना त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती दिली होती. मात्र खलप हे मांद्रे मतदारसंघातून अनेकवेळा निवडणूक हरलेले असल्याने त्यांच्या उमेदवारीला परब व बागकर यांचा विरोध आहे.

पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या समर्थकांनी त्या उमेदवारीला जाहीर विरोध करणे सुरु केले आहे.

सचिन परब, बाबी बागकर आणि ऍड. रमाकांत खलप यांच्यात मतैक्य करण्यासाठी प्रदेशाध्य गिरीश चोडणकर यांनी बोलावलेल्या बैठकीवेळी खलप पोचले तेव्हा त्यांची परब व बागकर समर्थकांनी हुर्यो उडवली होती. चोडणकर हे उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीतून उमेदवार असल्याने ते मांद्रे मतदारसंघात कॉंग्रेसमध्येच वाद होणार नाहीत याची काळजी घेत आहेत.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित देशमुख यांनी काल सकाळी खलप यांना त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती दिली होती. मात्र खलप हे मांद्रे मतदारसंघातून अनेकवेळा निवडणूक हरलेले असल्याने त्यांच्या उमेदवारीला परब व बागकर यांचा विरोध आहे.

राज्य निवडणूक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री, आमदार दिगंबर कामत यांनी याविषयावरून झालेला वाद आता चोडणकर यांनीच निस्तरावा अशी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून काम केलेले नीळकंठ हळर्णकर यांनाही कामत यांनी योग्य त्या शब्दात समज दिल्याची माहिती मिळाली आहे. खळप यांचे पूत्र निखिल यानी काल रात्री व्हॉट््सअॅप समूहावर खलप यांना पूर्वी ठरल्यानुसार परब व बागकर यांनी समर्थन द्यावे असा मजकूर पोस्ट केल्याने मांद्रे मतदारसंघात आता तणावाचे वातावरण आहे. खळप यांना उमेदवारी दिल्यानंतर कॉंग्रेसने विधानसभा व लोकसभेचा प्रचार करुनच दाखवावा असे आव्हान परब व बागकर यांच्या समर्थकांनी दिले आहे. आज तेथे तिन्ही गटांच्या बैठका होणार आहेत.

या घोळामुळे गेले पाच दिवस कॉंग्रेस या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करू शकलेली नाही.

Web Title: Ramakant Khalap contest election in Mandra Goa